CoronaVirus: काँग्रेस कार्यकारिणीची कोरोनाविषयी आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:21 AM2020-04-23T01:21:23+5:302020-04-23T01:26:01+5:30
कार्यकारिणी सदस्यांसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी होणार
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढ्यातील काँग्रेसची भूमिका अधिक व्यापक करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. कार्यकारिणी सदस्यांसह काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही यात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भाजपशासित राज्यांपेक्षाही उत्कृष्टकाम करून या संकटाच्या काळात काँग्रेस इतर पक्षांपेक्षा जनतेसाठी सेवा करण्यात सरस असल्याचे दाखवून द्यावे, असा सल्ला दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
रोजंदारी करणारे मजूर, शेतकरी, मध्यम वर्गातील लोकांसह सर्व जनतेला आवश्यक मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना दिले जातील. तसेच त्यांनी आतापर्यंत कोरोनाविरोधी लढ्यात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारकडून त्यांना मिळणाºया सहकार्याचाही आढावा घेण्यात येणार आहे.
निवेदनावर चर्चा करणार
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या निवेदनावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. हे निवेदन पंतप्रधान मोदी यांना सादर केले जाणार आहे.
गहू, हरभरा, मोहरीच्या खरेदीसाठी पुरेशा संख्येने खरेदी केंद्र सुरूकरणे, लघु आणि मध्यम उद्योग पुनरुज्जीवित करणे, छोटे व्यापारी, रोजंदारी करणारे मजूर, मनरेगा मजूर, आशा सेविकांसह अन्य कर्मचाऱ्यांना रेशनसोबत ७५०० रुपये रोख देण्याच्या शिफारशींचा काँग्रेसच्या निवेदनात समावेश असेल. अरब देशांच्या टिपणीची दखल घेत काँग्रेस सरकारवर दबाब आणण्याची शक्यता आहे.