CoronaVirus : चार कोटींच्या आसपास नोक-या धोक्यात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:00 AM2020-04-26T00:00:27+5:302020-04-26T00:00:45+5:30
एवढी घट तर २००८-०९ मध्ये जी जागतिक आर्थिक महामंदी आली होती, तेव्हासुद्धा झाली नव्हती.
प्रा. सुभाष गं शिंदे
सद्य:स्थितीत कोविड-१९ चा फटका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. चीनसह अमेरिका, जपान, भारत तसेच युरोपचा संघ अशा जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जगाच्या आर्थिक व्यवस्थेचा विकासदर एक टक्का वा त्याहूनही कमी होऊ शकतो. एवढी घट तर २००८-०९ मध्ये जी जागतिक आर्थिक महामंदी आली होती, तेव्हासुद्धा झाली नव्हती.
सद्य:स्थितीत कोविड-१९ चा फटका जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, तर कोविड-१९ मुळे १९५ दशलक्ष म्हणजेच जवळपास २० कोटींच्या आसपास लोकांना रोजगार व नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. ही स्थिती फारच भयावह आहे. हॉटेल, पर्यटन, उत्पादन, किरकोळ व घाऊक विक्री क्षेत्रांना या महामारीचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
भारताबाबतची आकडेवारी पाहिली, तर भारताचे दररोज ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. या २१ दिवसांच्या बंदच्या काळात भारताचे जवळपास सात-आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच ४० दशलक्ष म्हणजेच चार कोटींच्या आसपास नोक-या धोक्यात येऊ शकतात. ही आकडेवारी झोप उडवणारी आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण बंदी हा परिणामकारक उपाय असल्याने, ती सध्या तरी चालूच ठेवली पाहिजे. परंतु, सरकारी पातळीवर साथ संपल्यानंतर घ्यावयाच्या आर्थिक निर्णयांबाबत चर्चा होऊन योग्य ती उपाययोजना व धोरणे आखण्यास सुरुवात झाली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय बैठकादेखील घ्यावयास हव्यात.
केंद्र सरकारने आर्थिक विकासाचा गाठावयाचा दर, महागाई व वित्तीय तूट या तांत्रिक बाबी तूर्तास बाजूला ठेवून अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात चलन खेळते राहील, याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करायला हवी. ग्रामीण भागांत योग्य त्या वैद्यकीय सेवा व औषधे उपलब्ध करून देऊन रोजगार हमी योजनेंतर्गत कामं उपलब्ध करून दिली पाहिजेत. ग्रामीण भागांमध्ये शेतीची कामं टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या दृष्टीने विचार व्हायला हवा. कारण, खरीप हंगाम जवळ येत आहे व देशाची अन्नधान्याची गरज पाहता शेतीच्या कामांना प्राधान्य देणे क्र मप्राप्त आहे. अर्थात, हे सर्व करताना ग्रामीण जनतेला कोरोनाच्या दृष्टीने औषधे उपलब्ध असतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना योग्य तो आहार व औषधे द्यावयास हवीत. ही व्यवस्था शहरी विभागांमध्येदेखील करावयास हवी. मोठ्या, मध्यम व लघुउद्योगांमध्ये काम करणाºया कामगारांनासुद्धा औषधे व उपचारसुविधा सज्ज ठेवल्यास त्यांच्यात काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. या घडीला विविध आवश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू ठेवणे व कालांतराने ते वाढविण्याची गरज आहे. असे झाल्यास येणाºया काळात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निश्चित मदत होईल. अर्थात, हे सर्व करताना आरोग्यविषयक काळजी घ्यायला हवी.
भारताने औषधनिर्मिती करणारे क्षेत्र व कंपन्यांचा विकास करण्यावर जास्त भर द्यावयास हवा. मानवाने निसर्गाची एवढी अतोनात हानी करून ठेवली आहे की, भविष्यात अशा महामाºया येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे औषधे व वैद्यकशास्त्रातील संशोधन वाढवून या क्षेत्रात जास्त गुंतवणूक करावयास हवी.
सद्य:स्थितीत किरकोळ विक्रेत्यांना स्वच्छतेची काळजी घेऊन मोठ्या प्रमाणात आॅनलाइन पद्धतीने विक्री करण्यास सांगितले पाहिजे व त्यांना लागणारी मदत सरकारी, प्रशासकीय यंत्रणेने करायला हवी. यामुळे लोक खरेदीसाठी कमी बाहेर पडतील व विक्रेत्यांचेदेखील नुकसान कमी करणे शक्य होईल. शेतीच्या कामांप्रमाणे रस्ते, बंदर विकास, विमानतळबांधणी, वीजनिर्मिती आदी प्रकल्पांवरील कामं योग्य त्या वैद्यकीय उपाययोजना करून सुरू ठेवावयास हवी. शेवटी, या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास भविष्यात कंपन्या व कारखाने उभारण्यास मदत होईल. सध्या अमेरिका, युरोप, जपान तसेच युरोपमधील कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत़ याचा फायदा भारताने लागलीच घ्यायला हवा व या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करून घेतले पाहिजे. मात्र,पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
कोविड-१९ या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे, त्यामुळे ही फक्त भारताचीच वा महाराष्ट्राचीच समस्या नसून तिच्याविरुद्ध लढण्यासाठी सारे जग एकवटलेले आहे. त्यामुळे आपण या महामारीवर लवकरच मात करू, यादृष्टीने लोकांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे़
(लेखक जोशी-बेडेकर महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)