coronavirus :किरकोळ व्यापार क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका, मॉल, मल्टिप्लेक्स बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:57 AM2020-03-17T05:57:47+5:302020-03-17T05:58:40+5:30
लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.
बंगळुरू : कोरोनाच्या साथीमुळे संघटित किरकोळ विक्रीक्षेत्राला फटका बसला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे राज्य सरकारांनी मॉल व मल्टिप्लेक्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बसून संघटित किरकोळ विक्री क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.
‘अॅनारॉक रिटेल्स’चे एमडी आणि सीईओ अनुज केजरीवाल यांनी म्हटले आहे की, बंद झालेल्या आस्थापनांची संख्या मोठी आहे. अल्पकाळासाठी लावण्यात आलेल्या बंदीचेही लक्षणीय वित्तीय परिणाम होतील.
‘अॅनारॉक रिटेल’ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे येथील १२६ मॉल बंद आहेत. १00 मॉल्समध्ये मल्टिप्लेक्स आहेत.
केजरीवाल म्हणाले की, या आस्थापनांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. कोरोनामुळे आरोग्य आणीबाणीसारख्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या आस्थापना बंद करणे क्रमप्राप्तही आहे. मात्र, त्याचे वित्तीय परिणाम टाळणेही अवघड आहे.
परिस्थिती गंभीर
सूत्रांनी सांगितले की, भारतात कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे सरकारांकडून सातत्याने नवनव्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ‘लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये’, हा एकच उद्देश या उपाययोजनांमागे प्रामुख्याने दिसून येत आहे.
...तर विमान कंपन्या होतील दिवाळखोर
नवी दिल्ली : कोविद-१९ विषाणूच्या साथीमुळे जगातील बहुतांश विमान वाहतूक कंपन्या मे अखेरपर्यंत दिवाळखोरीत जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय हवाई सल्लागार संस्था ‘कापा’ने दिला आहे. सरकार आणि हवाई वाहतूक उद्योगाने कृती केली तरच हे संकट टाळले जाऊ शकते, असेही ‘कापा’ने म्हटले आहे.
‘कापा’ने म्हटले की, कोरोना विषाणू आणि त्यावर उपाय म्हणून जगभरातील सरकारांनी प्रवास व पर्यटनावर आणलेल्या मर्यादा यामुळे हवाई वाहतूक कंपन्या तांत्रिकदृष्ट्या याआधीच दिवाळखोरीत गेल्या आहेत. अनेक कंपन्यांचे कर्जाचे हप्ते थकायला सुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे जगातील विमान वाहतूक कंपन्यांनी परिचालनात कमालीची कपात केली आहे. डेल्टा एअरलाइन्सने ३00 विमाने जमिनीवर आणली असून, उड्डाणात ४0 टक्के कपात केली आहे. अमेरिकेने युरोपीय संघ, ब्रिटन, आयर्लंडच्या लोकांसाठी पर्यटन व्हिसावर बंदी घातली आहे. भारताने ११ मार्चपूर्वीचे सर्व पर्यटन व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द केले आहेत.
स्थिती कायम राहिल्यास मे २0२0च्या अखेरपर्यंत बहुतांश एअरलाइन्स दिवाळखोरीत जातील. हे संकट टाळण्यासाठी सरकार व हवाई उद्योग यांनी प्रयत्न करायला हवेत.
बुकिंग रद्द, विमाने रिकामी
जी विमाने उड्डाण करीत आहेत, ती अर्धी रिकामी आहेत. नवी बुकिंग जवळपास ठप्प झाली असताना आधी झालेले बुकिंग रद्द करण्याचे प्रमाणही मोठे आहे. ताफ्यात २६० विमाने असलेली भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, आपल्या दैनंदिन बुकिंगमध्ये १५ ते २० टक्के कपात झाली आहे. आपल्या तिमाही महसुलावर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.
‘आरक्षण रद्द केल्यास शुल्क आकारू नका’
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक लोक आपले प्रवासाचे बेत रद्द करत आहेत.
त्यामुळे तिकिटांचे आरक्षण रद्द केल्याबद्दलचे शुल्क रेल्वे व विमान कंपन्यांनी प्रवाशांना आकारू नये, अशी मागणी माकपचे खासदार एलामाराम करीम यांनी राज्यसभेत सोमवारी केली.
कोरोनासंदर्भातील चर्चेत करीम म्हणाले की, या साथीचा फैलाव रोखण्यासाठी काही राज्यांनी शिक्षणसंस्था व अन्य सार्वजनिक स्थळे काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोकांनी प्रवासाचे बेत रद्द केले आहेत.
त्यामुळे सध्याच्या स्थितीत अशा प्रवाशांकडून तिकीट आरक्षण रद्द केल्यास रेल्वे, विमान कंपन्यांनी तसेच राज्यांच्या परिवहन महामंडळांनी
पैसे घेऊ नयेत, असे आदेश सरकारने दिले पाहिजेत. एलामाराम करीम
यांच्या सूचनेला अन्य पक्षांच्या काही खासदारांनी पाठिंबा दिला.