CoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 07:16 AM2020-03-31T07:16:20+5:302020-03-31T07:24:45+5:30
CoronaVirus: प्रत्येक कोचमध्ये डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या राहण्याची सोय असणार आहे.
लखनऊ : आलमबाग येथील प्रवासी आणि माल डब्बा कारखान्यात येत्या तीन दिवसांत १०० बेड असणारी कोरोना केअर ट्रेन तयार होणार आहे. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये १०-१० रुग्ण आयसोलेट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, रेल्वेने एचएचबी कोच शिवाय जुने कंव्हेंशनल कोच सुद्धा आयसोलेशन वार्ड बनविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
डीआरएम संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, आलमबाग वर्कशॉपमध्ये दोन असे हॉस्पिटल तयार करण्यात येतील. दुसरा हॉस्पिटल पुढील आठवड्यात तयार होईल. ट्रेनच्या कोचमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्याची जबाबदारी मुख्य कारखान्याचे व्यवस्थापक मनीष पांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक कोचमध्ये डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या राहण्याची सोय असणार आहे. यासाठी कोचमध्ये २२० वोल्टचे स्वीच लावण्यासोबत मध्यभागी असणारे आणि बाजूला असणारे बर्थ हटविण्यात आले आहेत. यासोबत एक पँट्रीकार, दोन एक बोगी आणि एक जनरेटर कार सुद्धा जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोनावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. देशात कोरोनाचे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली.