coronavirus: कोरोनामुळे पारशी समुदायाने बदलली अंत्यसंस्काराची हजारो वर्षे जुनी पद्धत, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:16 PM2021-04-28T18:16:19+5:302021-04-28T18:16:43+5:30
coronavirus In India : पारशी समाजाने समाजातील मृत कोरोनाबाधित व्यक्तिंवर होणाऱ्या अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीने या बदलांना मान्यता दिली आहे.
मुंबई - गेल्या दीड वर्षापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने केवळ आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नाही तर विविध धर्मियांच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा परंपरा बदलण्याची वेळ आणली आहे. (coronavirus In India) कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पारशी समजाने आपल्या धर्मातील हजारो वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी समाजाने समाजातील मृत कोरोनाबाधित व्यक्तिंवर होणाऱ्या अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीने या बदलांना मान्यता दिली आहे. (Corona changes Parsi community's old method of cremation)
पारशी समाजामध्ये मृत व्यक्तीचे शरीर पक्ष्यांना खाद्य म्हणून देण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली होती. मात्र आता नव्या बदलानुसार पारशी समाजातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मृत व्यक्तीचे शरीर हे पक्षांना खाद्य म्हणून न ठेवता त्या शरीराचे दहन करण्यात येणार आहे. पारशी समाजामध्ये मृतदेह दहन वा दफन करण्याची पद्धत नव्हती. तर हा मृतदेह गिधाडासारख्या पक्षांना खाद्य म्हणून मोकळ्या जागेत ठेवण्यात येत असे. मृत्यूनंतर आपल्या शरीराचा कुणालातरी उपयोग व्हावा हा या परंपरेमागचा हेतू होता.
मात्र आता पारशी पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांना मोकळ्या जागी न सोडता त्यांचे दहन करण्याचा निर्णय घेतला आहे. पारशी पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पारशी महिला किंवा पुरुषांच्या मृतदेहांना आता टॉवर ऑफ सायलेन्स किंवा खोल खड्ड्यात मोकळे सोडण्याऐवजी त्यांचे दहन केले जाईल.
पारशी पंचायतीच्या एका सदस्याने सांगितले की, देशामध्ये पारशी समुदायाच्या लोकांची संख्या सुमारे १ लाख एवढी आहे. सध्या कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यात कोरोनाच्या नियमावलीचेही पालन करायचे आहे. त्यामुळेच पारशी समाजाने हा निर्णय घेतला आहे.