coronavirus : कोरोनाच्या संक्रमणाचा वेग वाढला, पण इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:46 PM2020-04-16T17:46:41+5:302020-04-16T17:53:06+5:30
देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरात देशातील देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला आहे. तसेच देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात असलेल्या प्रयत्नांची माहिती मंत्रिमंडळाला दिली. तसेच कोरोनविरोधातील लढाईत इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावाही मोदींनी केला. कोरोना विषाणूच्या फैलावासंबंधीची जागतिक आकडेवारी पंतप्रधानांच्या या दाव्याला दुजोरा देत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन या विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत.
जगभरात दर दहा लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचा आकडा 267 एवढा आहे. अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचे प्रमाण 1496 एवढे आहे. तर स्पेनमध्ये 3 हजार 864, इटलीमध्ये हजार 732 आणि फ्रांसमध्ये 2 हजार 265 एवढे आहे. तर भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेत.
जगभरात प्रत्येकी 10 लाख लोकांमागे सरासरी 17.3 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू होत आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.3 एवढे आहे. अमेरिकेत दर दहा लाख लोकांमागे 86 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांचा विचार केल्यास हे प्रमाण स्पेनमध्ये 402, इटलीमध्ये 358 आणि फ्रांसमध्ये 261 एवढे आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.