coronavirus: बिहार भाजपाच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचाऱ्यांसह ७५ नेत्यांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:55 AM2020-07-14T11:55:08+5:302020-07-14T11:56:13+5:30
लॉकडाऊनचे निर्बंध हळुहळू शिथील होऊ लागल्यानंतर कोरोनाचे संक्रमण अधिकच वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सक्रीय असलेल्या नेतेमंडळींना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे.
पाटणा - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग सध्या संपूर्ण देशात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. त्यातच लॉकडाऊनचे निर्बंध हळुहळू शिथील होऊ लागल्यानंतर कोरोनाचे संक्रमण अधिकच वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सक्रीय असलेल्या नेतेमंडळींना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. आता बिहारमध्येभाजपाच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह एकूण ७५ नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
बिहारमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यातच भाजपाच्या बिहारमधील कार्यालयालाही कोरोनाने विळखा घातला आहे. भाजपाच्या या कार्यालात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसह येथे ये जा असलेले नेते मिळून १०० जणांची कोरोना चाचणी काल करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह एकूण ७५ नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सध्या भाजपाचे हे कार्यालय सॅनिटाइझ करण्याचे काम सुरू आहे.
बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १८ हजारच्या आसपास रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनामुळे राज्याता १६० जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सुमारे १२ हजार ३१७ रुग्णांना आतापर्यंत कोरोनाला मात दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात कोरोनाचे पाच हजार ४८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे.