CoronaVirus: सतर्क राहा...कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय; नियमांचे पालन गरजेचे, ५ राज्यांना केंद्राची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:23 AM2022-06-04T06:23:31+5:302022-06-04T06:23:36+5:30
८४ दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून केंद्र सरकारने त्यावर चिंता व्यक्त केली आहे. पाचही राज्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आदेश केंद्राने संबंधित राज्य सरकारांना दिले आहेत. शुक्रवारी देशभरात ४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले. ८४ दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना पाठविलेल्या पत्रात कोरोनासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे नमूद केले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त तामिळनाडू, केरळ, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांनाही अशाच आशयाचे पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
पत्रात काय?
मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता २७ मे रोजी देशात
कोरोनाचे २४७१ नवे रुग्ण सापडले होते. ३ जूनला संख्या ४८८३ वर पोहोचली महाराष्ट्रातील संसर्ग दर वाढत आहे. गेल्या आठवड्यात १.५ टक्के असलेला हा दर ३.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण सापडत असलेल्या विभागांवर महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित करावे
चाचण्या वाढविण्यासाठी पावले उचलावीत, नागरिकांना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगावे.
देशात शुक्रवारी कोरोनाचे सर्वाधिक ४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या आता २१ हजार आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ कायम असून शुक्रवारी १,१३४ रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ५ हजार १२७ सक्रिय रुग्ण आहेत.
मास्कसक्ती करा...
कोरोनानियमांचे पालन न करणाऱ्या विमान प्रवाशांना दंड करावा व मास्कची सक्ती करावी असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.