coronavirus: चिंताजनक! देशातील ३४ जिल्ह्यांत १० दिवसांत दुपटीने वाढला कोरोना रुग्णवाढीचा वेग, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश
By बाळकृष्ण परब | Published: March 5, 2021 10:08 AM2021-03-05T10:08:00+5:302021-03-05T10:18:28+5:30
coronavirus in India : देशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे.
नवी दिल्ली - सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर अनुभवल्यानंतर भारतातील कोरोनाचा संसर्ग (coronavirus in India) उतरणीला लागला होता. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. देशभरातील १८० जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे ३४ जिल्ह्यांमध्ये गेल्या दिवसांत रुग्णवाढ ही दुपटीने वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक सहा जिल्हे महाराष्ट्रातील (coronavirus in Maharashtra) आहेत. तर पंजाबमधील ५, केरळ आणि गुजरातमधील प्रत्येकी ४ आणि मध्य प्रदेशमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. (Corona outbreak doubled in 10 days in 34 districts, including six districts in Maharashtra)
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १६ हजार ८३८ नवे रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान, १३ हजार ८१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १ कोटी ११ लाख ७३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ कोटी ८ लाख ३८ हजाक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक लाख ५७ हजार ५८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ७३ हजार ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
India reports 16,838 new #COVID19 cases, 13,819 discharges and 113 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
— ANI (@ANI) March 5, 2021
Total cases: 1,11,73,761
Total discharges: 1,08,39,894
Death toll: 1,57,548
Active cases: 1,76,319
Total vaccination: 1,80,05,503 pic.twitter.com/dvJmwZijdD
देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असताना लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत देशभरात १ कोटी ७७ लाख ११ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये १० लाख ९३ हजार ९५४ जणांना गुरुवारी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ लाख ३८ हजार ७७ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर ३० लाख ९३ हजार ९५४ जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे.
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ५९ लाख एवढी झाली आहे. आतापर्यंत ९ कोटी १७ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तब्बल २५ लाख ७५ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. येथे दररोज सुमारे ७० ते ८० हजार करोना रुग्ण सापडत आङेत. तर अमेरिकेमधील कोरोना रुग्णवाढ काहीशी कमी झाली आहे. येथे सध्या ६० ते ८० हजार कोरोना रुग्ण दररोज सापडत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत ही संख्या एक लाखांपेक्षा अधिक होती.