Coronavirus: भाऊ, नावातचं सगळं आहे! चक्क कोरोना रुग्णाला दिला डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 09:56 AM2020-05-24T09:56:56+5:302020-05-24T09:57:17+5:30
गुजरातमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधित रुग्णसंख्या अहमदाबादमध्ये आहे
अहमदाबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगात ५४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेतीन लाखाहून जास्त मृत्यू झाले आहे. एक कोविड रुग्ण अनेकांना कोरोना संक्रमित बनवतो हे सांगितलं जातं. त्यामुळे कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात येण्यापासून लोकांना सावध केले जाते. खरंतर असं म्हणतात, नावात काय आहे? मात्र एकाच नावाचे दोन व्यक्ती आढळतात तेव्हा काय होतं याचं धक्कादायक उदाहरण अहमदाबादच्या एका रुग्णालयात पाहायला मिळालं आहे.
गुजरातमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधित रुग्णसंख्या अहमदाबादमध्ये आहे, मात्र असं असतानाही शहरातील एका रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. याठिकाणी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह रिपोर्ट देऊन रुग्णालयातून डिस्चार्ज दिलं आहे. जो प्रत्यक्ष रिपोर्ट त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीचा होता.
शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चूक मान्य करत माफीनामा जारी केला. एका व्यक्तीला चुकीचा रिपोर्ट दिल्याने डिस्चार्ज देण्यात आलं पण चूक लक्षात येताच त्या रुग्णाला पुन्हा काही तासात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, जवळपास ५ तासाच्या दरम्यान एकाच नावाच्या दोन रुग्णांचा रिपोर्ट मिळाला. पहिला रिपोर्ट दुपारी २ वाजता आला ज्यात कोरोना व्हायरस रिपोर्ट निगेटिव्ह होती. रिपोर्टच्या हवाल्याने दोघांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आलं. पण त्याच नावाच्या दुसऱ्या रुग्णाचा रिपोर्ट संध्याकाळी ७ वाजता प्राप्त झाला. हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह होता. दुसरा रिपोर्ट मिळाला तो पाहिला असता दुपारी डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचा असल्याचं आढळून आलं.
रुग्णालयाची कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे गैरसमजातून ही चूक झाल्याचं अधिकाऱ्यांनी कबूल केले. यानंतर डिस्चार्ज झालेल्या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका तातडीने पाठवण्यात आली. या रुग्णाला हॉस्पिटलला आणलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने अशा प्रकरणात गांभीर्याने वागण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे.
एसवीपी रुग्णालयात आतापर्यंत ४ हजार १३१ कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे. शनिवारी सकाळपर्यंत शहरात ९ हजार ५७७ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत महामारीमुळे ६३८ लोकांचा जीव गेला आहे. अहमदाबाद शहरात सध्या ५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एसवीपी रुग्णालय हे अहमदाबाद महापालिकेचे सुपर स्पेशियलिटी रुग्णालय आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
जाणून घ्या! कोरोना व्हायरस कधीपर्यंत नष्ट होणार?; ज्योतिषांची ‘भविष्यवाणी’
“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च
“...तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”
येत्या १० दिवसांत ३६ लाख मजूर रेल्वेने घरी पोहोचणार; गरज असेपर्यंत ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांची सोय