coronavirus : देशातील 364 जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव, चार दिवसात 80 जिल्ह्यात झाले संक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:13 PM2020-04-12T17:13:09+5:302020-04-12T17:15:03+5:30
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही वाढवण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध भागात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढला आहे. आतापर्यंत देशातील 364 जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले असून, चिंतेची बाब म्हणजे केवळ चार दिवसात 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही वाढवण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 8 हजार 356 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 273 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात एकूण 718 जिल्हे आहेत. 6 एप्रिलपर्यंत त्यापैकी 284 जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसात अजून 80 जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे.
लॉकडाऊनपूर्वीच्या परिस्थितीचा विचार केल्यास लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वी 22 मार्चपर्यंत देशात केवळ 7 जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण होते. पुढे 29 मार्चपर्यंत हा आकडा 160 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. तर एप्रिलपर्यंत देशातील कोरोनाबाधित जिल्ह्यांची संख्या 211 झाली होती. 6 एप्रिलपर्यंत त्यापैकी 284 जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसात अजून 80 जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊन हा आकडा 364 पर्यंत पोहोचला.
एकंदरीत विचार केल्यास लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून आतापर्यंत सुमारे 289 जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव झाला आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सुरुवातीपासून आतापर्यंत 8 हजार 356 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 273 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.