coronavirus: देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 05:08 AM2020-10-27T05:08:18+5:302020-10-27T07:32:13+5:30

Corona vaccine Update : बिहारमधील लोकांना कोरोनाची लस मोफत देणार असे आश्वासन विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपने दिल्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

coronavirus: Corona vaccine free to all citizens of the country, Union Minister announces | coronavirus: देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

coronavirus: देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Next

नवी दिल्ली - केवळ बिहारमध्येच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात येणार आहे, असे केंद्रीय पशुविकास खात्याचे राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले. बिहारमधील लोकांना कोरोनाची लस मोफत देणार असे आश्वासन विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपने दिल्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. कोरोना साथीच्या कारणाचा वापर भाजप राजकीय स्वार्थासाठी करत आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. यासंदर्भात ओदिशाचे अन्नपुरवठा मंत्री आर. पी. स्वैन यांनी विचारलेल्या सवालाला प्रताप सारंगी यांनी रविवारी उत्तर दिले.

नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम, पुडुचेरी यांनी याआधीच केली आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत द्या अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. प्रताप सारंगी हे ओदिशाच्या बालासोर भागातील राजकीय नेते आहेत. ओदिशाच्या नागरिकांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. पण या विषयावर ओदिशातील लोकप्रतिनिधी असलेले केंद्रीय मंत्री काहीही बोलायला तयार नाहीत असेही त्या राज्याचे मंत्री  आर. पी. स्वैन म्हणाले होते.

महिनाभरात दुसऱ्यांदा नवे रुग्ण ५० हजारांखाली
नवी दिल्ली : देशात दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सोमवारी ५० हजारांहून कमी होती. या महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. तर सोमवारी ४८० जण या संसर्गाने मरण पावले असून सुमारे १०८ दिवसांनी दररोजचा मृतांचा आकडा इतका घटला आहे. सोमवारी कोरोनाचे ४५,१४८ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ७९ लाखांवर तर बळींची संख्या १ लाख १९ हजारांपेक्षा अधिक झाली आहे.


ॲस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे तरुण, वृद्धांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती
ॲॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तपणे विकसित करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे मानवी चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज या लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये निर्माण झाल्या. या लसीच्या आतापर्यंत झालेल्या चाचण्यांत सहभागी असलेल्या १८ ते ५५ वर्षे वयोगटातील स्वयंसेवकांमध्येही कोरोना विषाणूशी लढण्यासाठी उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.ॲॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेल्या या लसीसह आणखी काही आघाडीच्या औषध कंपन्यांच्या कोरोना लसविषयक प्रयोगांकडे साऱ्या जगाचे डोळे लागले आहेत.

आता ९८० रुपयांत कोरोना चाचणी
मुंबई : राज्यात सरकारी इस्पितळात कोरोनाची चाचणी मोफत आहे; खासगी प्रयोगशाळेतील चाचणीचेही दरही कमी झाले असून ९८० रुपयांत चाचणी होणार आहे. कोरोना चाचणीचे ४५०० वरुन ९८० रुपयांपर्यंत दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे.
 

Web Title: coronavirus: Corona vaccine free to all citizens of the country, Union Minister announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.