coronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर
By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 03:40 PM2020-09-21T15:40:25+5:302020-09-21T15:43:33+5:30
मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता.
नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले होते. त्यानंतर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तबलिगी जमातवर कोरोना पसरवल्याचा आरोप होऊ लागला होता. दरम्यान, तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमामुळे देशातील काही भागात कोरोना पसरल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. मार्चमध्ये दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहोचला, असे केंद्रिय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेमध्ये सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेमध्ये सांगितले की, दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या २३३ सदस्यांना अटक केली आहे. तसेच २९ मार्च रोजी संघटनेच्या मुख्यालयामधून २ हजार ३६१ जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याबाबतचा तपास सुरू आहे, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी लेखी उत्तराच्या माध्यमातून राज्यसभेमध्ये ही माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग सरू झाल्यानंतर विविध प्राधिकरणांनी दिलेल्या सूचना आणि आदेशांकडे दूर्लक्ष करत दीर्घकाळ मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था न करता एका बंद परिसरात मोठी सभा झाली. त्यामुळे अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या साथीच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे कारस्थान आणि मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मौलाना साद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात जाणीवपूर्वक साथ पसरवल्याचा, संभाव्य सामूहिक हत्येचे प्रयत्नांसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सरकार आणि प्रशासनाने मिळून तब्बल साडे पंचवीस हजार जमातींना शोधून शोधून क्वारेंटाइन केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी