CoronaVirus: कोरोना वॉरियर्सचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला १ कोटी; 'या' राज्य सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 01:52 AM2020-04-19T01:52:40+5:302020-04-19T07:00:37+5:30
डॉक्टर, पोलीस, सामान्यांसाठीही योजना
- नितीन नायगावकर
नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची सेवा असो वा गरीब, उपेक्षितांची सेवा असो, सध्याच्या परिस्थितीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कुणाचाही कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचा सन्मान निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवार) केली.
गेल्या महिन्यात दिल्ली सरकारने आरोग्यसेवकांसाठी ही योजना जाहीर केली होती. मात्र, आता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह पोलीस, शिक्षक यांच्यासह सर्व सेवेकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. यात कुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ही मदत देण्यात येईल, असे केजरीवाल म्हणाले. आरोग्यसेवक कोरोनाच्या रुग्णांसाठी अहोरात्र झटत असतानाच हजारो लोक वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देत आहेत.
मी उपकार करीत नाही
आज मला एका ऑटोरिक्षाचालकाचा फोन आला. त्याच्या खात्यात ५ हजार रुपये जमा झाल्याबद्दल माझे आभार मानले. मी कुणावरही उपकार करीत नाही, हा तुमचाच पैसा आहे आणि तो तुम्हाला देणे माझे कर्तव्य आहे. आतापर्यंत १ लाख चालकांचे अर्ज आले असून आाणखीही नोंदणी सुरू आहे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली