coronavirus: कामवाल्या बाईला कोरोनाची लागण, वैद्यकीय अहवालात कोरोना पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 06:21 PM2020-03-23T18:21:58+5:302020-03-23T19:56:33+5:30
रोहतक येथील आपल्या माहेरी २ दिवसांपूर्वीच ही महिला आली होती. सदर महिला नौलथा येथे ज्या कुटुंबात घरकामाचं काम करत होती. त्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली होती
चंढीगड - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह देशात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अगदी सहजच पसरत आहे. हरयाणात कोरोनाची एक नवीन केस समोर आली आहे. रोहतक येथे एक महिला कोरोना व्हायरसने पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आलंय. संबंधित महिला पानीपत येथील नौलथा येथे घरकाम (कामवाली) म्हणून काम करत होती.
रोहतक येथील आपल्या माहेरी २ दिवसांपूर्वीच ही महिला आली होती. सदर महिला नौलथा येथे ज्या कुटुंबात घरकामाचं काम करत होती. त्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तेथूनच या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे रोहतक येथे ही महिला ४ ते ५ महिलांच्या संपर्कात आली होती. या सर्वच महिलांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या महिलांचा वैद्यकीय अहवाल येणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, या महिलेसह हरयाणातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. कोरोनाचा होत असलेला पसार लक्षात घेऊनच पंजाबमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर, आता महाराष्ट्र सरकारनेही संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला होता.