coronavirus: महाराष्ट्रासह या दहा राज्यात कोरोनाची स्थिती भयावह, आरोग्य मंत्रालयाने सादर केली चिंताजनक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:59 PM2021-04-27T15:59:09+5:302021-04-27T16:01:55+5:30
coronavirus in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील दहा राज्यांमध्ये कोरनाची स्थिती भयावह असून, एका दिवसांत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रासह या दहा राज्यांमध्ये आहेत.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा देशाली आरोग्य व्यवस्थेला जोरदार दणका बसला आहे. (coronavirus in India) बेसुमार वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे. या परिस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार देशातील दहा राज्यांमध्ये कोरनाची स्थिती भयावह असून, एका दिवसांत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रासह या दहा राज्यांमध्ये आहेत. दरम्यान, काल सापडलेल्या ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ एवढी झाली आहे. (Corona's condition is dire in ten states including Maharashtra, alarming figures released by health ministry)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहे. तर एकूण बाधिकांची संख्या ही १६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजारी रुग्णांच्या संख्येमध्ये ६८ हजार ५४६ ने वाढ झाली आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये आहेत. देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
देशातील दैनंदिन संसर्गाचा दर सध्यातरी २०.०२ टक्के एवढा आहे. मंत्रालयाने एकूण राष्ट्रीय मृत्यूदरात घट झाल्याचे सांगितले. सध्या हा दर १.१२ टक्के आहे. देशात गेल्या २४ तासांत एकू २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ५२४ आणि दिल्लीमध्यी ३८० मृतांचा समावेश आहे.
दरम्यान, कालच्या दिवसभरात देशात २ लाख ५१ हजार ८८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही १ कोटी, ५६ लाख २०९ वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत देशभरात एकूण १४.५ कोटी लोकांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे.