Coronavirus: कोरोना घटला, बेफिकीरपणा वाढला, सहा फोटो दाखवत केंद्र सरकारने पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 06:48 PM2021-07-06T18:48:24+5:302021-07-06T18:50:17+5:30
Coronavirus News: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना विविध निर्बंधांमधून सवलत दिली गेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी भयावह वाटणाऱ्या कोरोनाच्या संकटाची भीती आता लोकांना वाटेनाशी झाली आहे. (Coronavirus in India) अनेक ठिकाणी बाजारांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर पर्वतीय क्षेत्रातील शहरे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. (Pictures (from hill stations) are frightening. People must comply with COVID-appropriate behaviour: Dr Balram Bhargava, DG, ICMR)
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पर्वतीय भागात पर्यटनासाठी जाणारे लोक कोरोनाला रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन करत नसल्याचे सांगितले आहे. तसेच जर नियमांचे पालन झाले नाही तर निर्बंधांमध्ये मिळालेली सुट पुन्हा एकदा बंद केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कोरोनाची दुसरी लाट काही मर्यादित प्रदेशांमध्ये अद्यापही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयाने पर्वतीय क्षेत्रांमध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गर्दी पाहून त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन हे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली घट कमी करू शकते. अग्रवाल यांनी सांगितले की, देशामधील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांपैक्षा कमी झाली आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्याही ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांमध्ये १० टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह अधिक रुग्ण सापडत आहेत.
दरम्यान, पर्वतीय भागातील बाजारांमधील समोर येत असलेल्या फोटोंवरून आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, हे फोटो भयावह आहेत. लोकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे. भविष्यातील आव्हान हे कोरोनाची तिसरी लाट नाही तर आम्ही त्याबाबत काय भूमिका घेतो ही असेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या रूपावर चर्चा करण्याऐवजी आपण सर्वांनी या लाटेला रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यावर लक्ष दिले पाहिजे.
Pictures (from hill stations) are frightening. People must comply with COVID-appropriate behaviour: Dr Balram Bhargava, DG, ICMR pic.twitter.com/QI1Uie29UP
— ANI (@ANI) July 6, 2021
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ३४ हजार ७०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३ कोटी ०६ लाख १९ हजार ९३२ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ५५३ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३ हजार २८१ एवढी झाली आहे. गेल्या १११ दिवसांत आढळलेले हे कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आहेत. तर गेल्या ९० दिवसांमधील हे सर्वात कमी रुग्ण आहेत. सध्या देशात कोरोनाचे ४ लाख ६४ हजार ३५७ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील कोरोनामुक्त लोकांचे प्रमाण ९७.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे.