Coronavirus: ...तर जूनच्या मध्यापर्यंत कोरोनाचा धोका टळेल; टाइम्स-प्रोटिव्हिटी सर्व्हेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 01:21 PM2020-04-22T13:21:18+5:302020-04-22T13:51:52+5:30
कोरोनाला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत.
नवी दिल्ली: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टाइम्स नेटवर्कने प्रोटिव्हीटी या जागतिक सल्लागार संस्थेच्या मदतीने केलेल्या संयुक्त पाहणीत मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना कमाल मर्यादा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
टाइम्स नेटवर्कच्या 'टाइम्स फॅक्ट इंडिया आउटब्रेक रिपोर्ट'मध्ये तीन वेगवेगळ्या शक्यता दर्शवण्यात आल्या आहेत. यामध्ये २२ मे पर्यंत भारतात ७५ हजार लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भारतातील लॉकडाउन ३ मेनंतरही वाढवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील कोरोना विषाणूच्या पुनरुत्पादनाचा दर ०.८ इतका असणार आहे. त्यामुळे एक कोरोनाचा रुग्ण ०.८ इतर लोकांमध्ये कोरोना पसरवू शकतो असा अंदाजही या अहवालात नमूद करण्यात आला आहे.
टाइम्स-प्रोटिव्हिटी सर्व्हेचा अंदाजानुसार, देशात सरकारने १५ मेपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केला तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर येण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यतचा कालावधी लागणार आहे. तसेच दूसऱ्या अंदाजानूसार देशभरात जर ३० मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जूनच्या मध्यावर शुन्यावर येईल असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
आणखी वाचा...
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ