coronavirus: कोरोनास्थिती अतिवाईटाकडे, संपूर्ण देशालाच जोखीम, महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:51 AM2021-03-31T07:51:40+5:302021-03-31T07:52:29+5:30
coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशापुढील कोरनास्थितीचे संकट विशद केले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आढळून येत आहे, असे पॉल यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असून, तेथील परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याचे पॉल म्हणाले. रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही पॉल यांनी नमूद केले.
केंद्राने केलेल्या सूचना...
अनेक राज्यांमध्ये बाधितांचे विलगीकरण घरीच होत आहे. परंतु त्यावर नीट लक्ष ठेवले जात नाही
तसे होत नसेल तर बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे
बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा ७२ तासांत शोध घेतला जावा
आरटी-पीसीआर चाचण्यांवर अधिकाधिक भर दिला जाणे गरजेचे
दाट वस्त्यांमध्ये रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक व्हाव्यात
घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आला नाही
महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे ३,३७,९२८ सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरी एका दिवसात तीन हजार नवे रुग्ण येत आहेत. आतापर्यंत एका दिवसात ३४ हजार रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका दिवशी ३२ मृत्यू हाेत आहेत. ते वाढून ११८ झाले आहेत.
राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव
देशाची सद्य:स्थिती
गेल्या २४ तासांत आढळलेले बाधित
५६,२११
मृत्युमुखी पडलेले बाधित : २७१
आजपर्यंतचे बाधित
१,२०,९५,८५५
बरे झालेले बाधित
१,१३,९३,०२१
उपचाराधीन रुग्ण
५,४०,७२०
एकूण कोरोनाबळी
१,६२,११४
कोरोनाचा विषाणू अजूनही खूप सक्रिय आहे. हा विषाणू आपले सुरक्षाकवच भेदू शकतो. कोरोना नियंत्रणात आला आहे, असे आपण समजत असतानाच तो पुन्हा हल्ला करू शकतो. त्यामुळे संपूर्ण देशानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
व्ही.के. पॉल,
निती आयोगाचे सदस्य
ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. ही अट ३० जूनपर्यंत लागू राहील.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. रुग्णसंख्येत दैनंदिन होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत.
रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून, वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.