coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 05:40 PM2021-03-19T17:40:07+5:302021-03-19T17:41:36+5:30

coronavirus In Punjab : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रापाठोपाठ अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

coronavirus: Coronavirus fear increased, strict restrictions imposed by the Punjab Government | coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध

coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध

Next

चंदिगड - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना विषाणूचा फैवाव मोठ्या वेगाने होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रापाठोपाठ अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सरकार अलर्ट झाले असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat increased, strict restrictions imposed by the Punjab Government )

वाढत्या कोरोनामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोरोनाला रोखण्यासाठी या निर्णयांची घोणषा केली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे प्रभावित असलेल्या ११ जिल्ह्यांत सर्व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सोबतच सर्व शिक्षण संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामधून वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांना सूट देण्यात आली आहे. हे निर्बंध २१ मार्चपासून सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत लागू राहतील. या दरम्यान, विवाह आणि लग्न समारंभांना परवानगी असेल. मात्र त्यामध्ये केवळ २० लोकांना सहभागी होता येणार आहे.  

पंजाबमधील लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, अमृतसर, होशियारपूर, कपूरथला, शहीद भगतसिंगनगर, फत्तेहगड साहिब, रोपड आणि मोगा या जिल्ह्यात हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्याबरोरच या जिल्ह्यांमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. राज्यामध्ये चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉलमध्ये एकावेळी १०० हून अधिक जणांना गोळा होण्यास परवानगी नसेल. घरगुती कार्यक्रमांनाही १० हून अधिक लोकांच्या एकत्र होण्यावर बंदी आणण्यात आली आहे.  

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कडक उपाययोजना आखण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. 

राज्य शासनाने परिपत्र काढून नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 17 मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Web Title: coronavirus: Coronavirus fear increased, strict restrictions imposed by the Punjab Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.