coronavirus: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 07:40 PM2020-08-24T19:40:41+5:302020-08-24T19:42:26+5:30
आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे.
चंदीगड - कोरोना विषाणूचा देशात होत असलेला फैलावा अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रात वावरत असणाऱ्या अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: खट्टर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच काही केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्यांमधील मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.
आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे. मी आज माझी कोरोना चाचणी करवून घेतली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात जे सहकारी आणि इतर व्यक्ती माझ्या संपर्कात आले होते, अशांनी स्वत:ची कोरोना चाचणी करवून घ्यावी, तसेच माझ्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्यांनी क्वारेंटिन व्हावे, असे मी आवाहन करतो, असे आवाहन खट्टर यांनी केले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत खालावली; दिल्लीहून संरक्षण दलाच्या डॉक्टरांचे पथक येणार
उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना दहा दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांची तब्येत आणखी खालावली असून भारतीय संरक्षण दलाच्या रुग्णालयातील एक पथक आणि एम्सचे एक पथक सायंकाळपर्यंत गोव्यात पोहचत आहे. या पथकाने तपासणी केल्यानंतरच त्यांना दिल्लीत हलविण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सकाळपासून त्यांची ऑक्सिजनची पातळी उतरल्याचे ते म्हणाले.
,