coronavirus: दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, आतापर्यंत १३ जणांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:48 PM2020-06-02T12:48:50+5:302020-06-02T12:50:46+5:30
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयापर्यंत कोरोनाने धडक दिली असून, नायब राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
नवी दिल्ली - लॉकडाऊनमधून काहीशी सूट दिल्यानंतर दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना राज्यातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आता दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयापर्यंत कोरोनाने धडक दिली असून, नायब राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
जवळपास सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर सरकारने देशातील व्यवहार हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र निर्बंध शिथील होऊ लागल्यावर देशातील कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. दिल्लीत तर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यातच नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील काही जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, २८ ते ३१ मे दरम्यान, दिल्लीमध्ये सलग चार दिवस हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मात्र १ जून रोजी या प्रमाणात किंचीतशी घट झाली. सोमवारी दिल्लीमध्ये कोरोनाचे ९९० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत २० हजार ८३४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ५२३ जणांचा मृत्यू झाल्या आहे.
दिल्लीतील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीत कोरोनाचे ११ हजार ५६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पैकी २ हजार ७४८ रुग्ण हे कोविड रुग्णालयात दाखल आहेत. यामधील २१९ रुग्ण आयसीयूमध्ये तर ४२ जण व्हेंटिंलेटरवर आहेत.