coronavirus: तुलनेने भारतात कोरोनाचे रुग्ण जास्त, मात्र मृत्यूदर बराच कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:49 AM2020-07-09T03:49:48+5:302020-07-09T06:57:06+5:30
जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत भारतात एक लाखाहून अधिक कोविड केसेसची नोंद करण्यात आली आहे. अर्थात दर दिवसाला सरासरी वीस हजार रूग्ण नोंदविले गेले. भारतात एकूण रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
पुणे : भारताने कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये इतर देशांना मागे टाकत जगात तिसरा क्रमांक घेतला असला तरी भारतातील मृत्यूदर इतके कमी आहे की जागातिक यादीत भारताचा सातवा नंबर लागतो. भारताच्या दृष्टीने ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत भारतात एक लाखाहून अधिक कोविड केसेसची नोंद करण्यात आली आहे. अर्थात दर दिवसाला सरासरी वीस हजार रूग्ण नोंदविले गेले. भारतात एकूण रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णसंख्येच्या बाबत आपण रशियालाही मागे टाकत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोचलो आहोत. एकीकडे ही भयावह परिस्थिती असली तरी दुसरीकडे जीव वाचविण्याच्या बाबत मात्र आपण सरस ठरतो आहोत. देशामध्ये कोविडमुळे २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या आणि मृत्यूची आकडेवारी पाहता मृत्यूदर केवळ ३ ते २.९ टक्के इतके आहे. अमेरिकेमध्ये मृत्यूदर तब्बल ५ ते ४.६ इतका नोंदविला गेला आहे. असे असले तरी भारतातील काही राज्यात मृत्यूदर अमेरिकेलाही मागे टाकेल इतका आहे, त्यामध्ये गुजरातचा (५.४ टक्के) मोठे उदाहरण आहे.