Coronavirus: कोरोनाचं माहीत नाही; पण जेवण न मिळल्यास आम्ही उपासमारीनं नक्कीच मरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:08 AM2020-03-26T11:08:44+5:302020-03-26T19:11:42+5:30
दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढतच चाललं आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला असून, संक्रमितांची संख्याही ५६०हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जनतेही चिंतेत असून, केंद्र आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढतच चाललं आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचंही आवाहन केलं जातं आहे. सगळ्यांनाच घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उपासमारीची चिंता सतावू लागली आहे. दिल्लील जवळपास १५०हून अधिक मजूर आणि त्यांचे कुटुंबीय भुकेनं व्याकूळ असून, त्यांच्याकडे पाहणारं कोणीच नाही.
दक्षिण दिल्लीतल्या छत्तरपूरस्थित फतेहपूर बेरीच्या चंदन होला भागात मजुरांची संख्या लक्षणीय आहे. घराबाहेर पडून हे मजूर हात जोडून उभे राहिलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्या मजुरांना काहीही मिळालेलं नाही. ते दररोज मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यापुरते पैसे कमावतात. त्या पैशातच कुटुंबाचाही उदरनिर्वाह केला जातो. संचारबंदी लागू केल्यानं जे काही पैसे उरलेले होते, त्यात दोन दिवस त्यांचं भागलं. परंतु आता घरात काहीही अन्न शिल्लक नाही. तसेच त्यांच्याजवळ आता पैसेसुद्धा नाहीत.
@ArvindKejriwal
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) March 26, 2020
दिल्ली के फतेहपुर बेरी के चंदन होला इलाके में मजदूरों के परिवार के करीब 150 लोग एक साथ रह रहे हैं,साथ रहने से इन्हें कोरोना से संक्रमित होने का खतरा है,फिलहाल उन्हें लिए सबसे बड़ा खतरा भूख है,सभी हाथ जोड़कर कह रहे हैं उन्हें खाना दो!#lockdownindiapic.twitter.com/Fo0JVb3RmA
यांच्याकडे रेशन कार्डही नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले हे मजूर रोजंदारी करून पोट भरतात आणि उदरनिर्वाह करतात. दिल्लीत जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन करण्यात आल्यानं ते स्वतःच्या गावीसुद्धा आता जाऊ शकत नाहीत. या मजुरांकडे जेवणासाठी सामान आणि पैसेसुद्धा नाहीत.
एका मुलानं पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, ४ दिवसांपासून उपाशी आहे, मला खाण्यासाठी काहीही मिळालेलं नाही. वडील बाजारात गेल्या पोलीसवाले त्यांना मारून परत पाठवतात. नोकरदारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु ज्यांचं हातावर पोट असलेल्यांनी काय करायचं, अशा प्रश्न आता विचारला जात आहे. ज्या मजुरांकडे रेशनिंग कार्ड आहे, त्यांना धान्य मिळेल. परंतु ज्यांच्याकडे रेशनकार्डच नाही, अशा मजुरांनी काय खायचं. यावर सरकारकडून ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नगरसेवक, आमदार आणि खासदारांकडून यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. दिल्लीतला आज ७वा दिवस असून, या मजुरांना कोणताही सरकारी कर्मचारी किंवा एनजीओ भेटायला गेलेले नाहीत. सर्वच लोक मीडियाला विनंती करून न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.