CoronaVirus : कोरोना व्हायरसचा जन्मदाता कोण?; चीन अन् अमेरिकेत वाकयुद्धाचा भडका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 03:38 PM2020-04-01T15:38:03+5:302020-04-01T15:54:16+5:30
अमेरिकेनं चीन आणि डब्ल्यूएचओवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. भारतीय वैज्ञानिकांनीही चीननं माहिती लपवण्याचा संशय व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रकोप पूर्ण जगाला सहन करावा लागतो आहे. सप्टेंबर २०१९मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यातच कोरोनाचा जन्मदाता कोण? हा प्रश्न आता अख्ख्या जगाला पडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीन अन् अमेरिकेमध्ये जोरदार वाक्युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेनं चीन आणि डब्ल्यूएचओवर कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. भारतीय वैज्ञानिकांनीही चीननं माहिती लपवण्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर चीननंही अमेरिकेच्या आरोपांचं खंडन केलं असून, स्पष्टीकरण दिलेलं आहे.
कोरोनामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला असून, चीनला आता त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. भारतातले चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनवर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. आमच्याकडे १५५१ कोरोना संक्रमित असे रुग्णं आढळले आहेत की, ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती, असंही त्यांनी सांगितलं आहे. खरंतर अमेरिकेसह जगभरातले अनेक देश चीननं कोरोनासंबंधीची माहिती दडवल्याचं समजत आहेत. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस लोकांमध्ये पसरत चालला आहे.
युरोप, अमेरिका आणि इस्राएल सर्वच देश कोरोनानं हैराण
युरोपातील सर्वच देश, अमेरिका, इस्राएलसह अनेक देशांना कोरोना विषाणूंच्या जन्मदाता कोण हे जाणून घ्यायचं आहे. देशातील सर्वच देशांचा सर्वाधिक संशय चीनवर आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाची सुरुवात झाली आहे. संक्रमण वाढल्यानंतर चीननं वुहान शहर लॉकडाऊन केलं होतं. आता वुहानमधली परिस्थिती सामान्य झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक सुरू झाली असून, औद्योगिक कंपन्यांनीही कामकाज सुरू केले आहे. दुसरीकडे जगातील देशांमध्ये लॉकडाऊन चालू आहे.
कोरोनाला जैविक हल्ल्यासाठी चीननं विकसित तर नाही ना केलं?
जैविक किंवा रासायनिक हल्ल्यासाठी हा विषाणू विकसित केलेला असल्यास त्यात कोणतीही नवी गोष्ट नाही. जगातील अनेक देशांकडे जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रं आहेत. डीआरडीओच्या एका माजी वैज्ञानिकांनुसार अनेक देशांजवळ जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रांपासून बचाव करण्याची साधनं तयार आहेत. कोरोना हे एक जैविक हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेलं शस्त्रास्त्र असल्याचा अनेक देशांचा समज आहे. या जीवाणूला विकसित केले जात असतानाच चाचणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यानं प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकांनाच याचं संक्रमण झालं. संक्रमित वैज्ञानिकांच्या माध्यमातून हा जीवाणू प्रयोगशाळेच्या बाहेर आला आणि जगभरात पसरला. वटवाघळापासून हा व्हायरस तयार झाल्याचीही एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच कोरोनाच जन्म कसा झाला, याचा शोध आता सर्व देश मिळून घेत आहेत.