coronavirus: देशात कोरोनाचा फैलाव धोकादायक पातळीवर, चिंता व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:01 PM2021-04-16T16:01:48+5:302021-04-16T16:02:50+5:30
coronavirus In India : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या देशातील फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus In India) महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील विविध आरोग्य सेवांचा दौरा करून कोरोनावरील पुढील रणनीती बाबत डॉक्टरांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. (Coronavirus spread in India at dangerous level, the health minister Dr. Harshvardhan expressing concern & made a big statement)
हर्षवर्धन यांनी आज एम्सचा दौरा केला. यावेळी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि रुग्णालयातील अन्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशभरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही विविध रुग्णालयांचा दौरा करत आहोत. तसेच पुढील तयारीसाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमसोबत चर्चाही करत आहोत. तुम्हाला माहिती असेलच की गेल्यावर्षी कोरोनाविरोधात लढाईला सुरुवात झाली होती तेव्हा प्रत्येक बाबतीत उणिवा दिसून येत होत्या. मात्र आम्ही अनुभवामधून खूप काही शिकलो आहोत. तसेच आमचा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला आहे.
२०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र २०२१ मध्ये आमच्या डॉक्टरांकडे कोरोनाविरोधात लढण्याचा अनुभव अनेक पटींनी अधिक आहे. देशात केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. देशतील कुठल्याही रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सची टंचाई होऊ दिली जाणार नाही. आतापर्यंत कुठल्याही राज्याने आमच्याकडे व्हेंटिलेटर्स ची मागणी केलेली नाही. बहुतांश राज्यांनी केंद्राकडून पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचासुद्धा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागा नाही, अशी माहितीही हर्शवर्धन यांनी दिली.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनोचे २ लाख १७ हजार ३५३ रुग्ण सापडले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर दिवसभरात ११८५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत तब्बल १ लाख १८ जार ३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.