Coronavirus: “पहिल्यांदा खोकला, त्यानंतर तीव्र ताप अन् शेवटी श्वास थांबतो”; १५ दिवसांत ३२ जणांचा रहस्यमय मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:54 PM2021-05-10T19:54:40+5:302021-05-10T19:55:42+5:30
हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत.
देवरिया – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील अडिला गावात गेल्या १५ दिवसांत २० लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. या गावातील बऱ्याच जणांचे मुंडन झालेले पाहून अनेकांना धक्का बसत आहे. गावात प्रवेश केल्यानंतर कोणाच्या घरात दहावा असतो तर कोणाच्या घरात श्राद्धाची तयारी सुरू असते. काही लोक स्मशानभूमीतून कोणावर अंत्यसंस्कार करून परतलेले असतात.
हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. बैदा गावांत एक आठवड्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आरोग्य विभागाने अडिला गावात जाऊन मृतकाच्या कुटुंबासह ७२ लोकांची अँन्टिजेन चाचणी केली. परंतु एकच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे नेमकं इतरांच्या मृत्यूचं कारण काय? याचा तपास आरोग्य विभाग करत आहे. गावात कोरोनासोबतच आणखी एका आजाराची दहशत गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे गावात शांतता पसरली असते. लोक एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत. गावांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.
जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी अंतरावर अडिला गावात आरोग्याच्या सर्व सुविधा आहेत. गावात आरोग्य केंद्रापासून हेल्थ आणि वेलनेस सेंटरही आहे. १५ दिवसांपासून गावात मृत्यूची मालिका सुरु झालीय आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी झालेल्यांमध्ये १५ लोकांचे वय ६५ ते ७० वयोगटातील आहे. तर अन्य २४ ते ५० वयोगटातील आहेत. सर्वांच्या मृत्यूचं कारण एकच आजार आहे. पहिला खोकला, तीव्र ताप त्यानंतर अचानक श्वास थांबून मृत्यू होत आहेत.
गावातील ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी मात्र केवळ १ पॉझिटिव्ह
मृतकांमध्ये कोणीही कोरोनाची चाचणी केली नव्हती. पण सुरुवातीच्या लक्षणांप्रमाणे या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगण्यात आलं. रविवारी आरोग्य विभागाने गावात जाऊन मृतकांच्या कुटुंबासह ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी केली. ज्यात १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे गावात कोरोनाव्यतिरिक्त अन्य दुसरा आजार आल्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे.
अधिकारी काय म्हणाले?
अँन्टिजेन चाचणी योग्य मानली जाते. काही लोकांसाठी आजाराची भीतीही धोकादायक ठरू शकते असं मुख्य आरोग्य अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले. गावाचे सरपंच विनीत उपाध्याय म्हणाले की, गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक भीतीच्या सावटाखाली आहेत की आता याच्यानंतर कोणाचा नंबर येईल. तर वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे इंफेक्शन होत आहेत. सध्या गावाला सॅनिटायझ केले जात आहे. आरोग्य विभाग याचा तपास करत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी दिली.