coronavirus: कोरोनाची माहिती दडविल्याप्रकरणी देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:35 AM2020-03-16T04:35:17+5:302020-03-16T04:35:49+5:30
आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते.
लखनऊ : कोरोनाची लागण झाल्याची माहिती दडविणे व प्रतिबंधक उपाय योजण्यात सरकारला सहकार्य न देणे याबद्दल देशातील पहिला फौजदारी गुन्हा रविवारी आग्रा पोलिसांनी नोंदविला.
आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीखेरीज हे दाम्पत्य ग्रीस व फ्रान्सलाही गेले होते.
हे दाम्पत्य इटलीहून मुंबईत आले व तेथून बंगळुरुला गेले. तेथे तिच्या पतीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने दोघांनाही विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आले. परंतु तेथून ती ८ मार्च रोजी न सांगता बाहेर पडली. थोडया दिवसांनी तिलाही कोरानाची लागण झाली. यानंतर ही महिला दिल्ली गेली व नंतर रेल्वेने आग्रा येथे माहेरी आली. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे वडील उत्तर रेल्वेचे कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)
बंगळुरूहून गायब, आग्रा येथे सापडली
बंगळुरुहून ‘गायब’ झालेली ही महिला आग्रा येथे आल्याचे कळल्यावर जिल्हा प्रशासनाने ती नेमकी कुठे आहे हे शोधून काढले. अधिकारी तिच्या माहेरी पोहोचले. तिच्या माहेरी एकूण नऊ व्यक्ती राहतात. त्या सर्वांना विलगीकरण वॉर्डात हलविण्याचा अधिकाऱ्यांनी आग्रह धरला. परंतु या महिलेच्या वडिलांनी याला कसून विरोध केला. पण अधिकाºयांनी गय केली नाही. घरातील सर्वांना इस्पितळात नेऊन तपासणी केली गेली. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.