CoronaVirus News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण तिप्पट करणार- गृहमंत्री अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:52 AM2020-06-15T03:52:38+5:302020-06-15T03:52:55+5:30
गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला दिल्लीतील परिस्थितीचा आढावा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील कोविड-१९ च्या महामारीचा वाढता प्रसार लक्षात घेता येत्या सहा दिवसांत शहरांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून सध्याच्या तिप्पट केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे जाहीर केले.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहा यांनी दिल्लीतील कोरोना साथीचा आढावा घेतला. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्राकडून दिल्ली सरकारला सर्व प्रकारची मदत व सहकार्य देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
शहा म्हणाले की, चाचण्यांचे प्रमाण येत्या दोन दिवसांत दुप्पट व सहा दिवसांत तिप्पट केले जाईल. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत शहरातील ‘कंटेन्मेंट झोन’मधील प्रत्येक मतदानकेंद्रावर कोरोना चाचणीची सोय उपलब्ध करून दिली जाईल. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी इस्पितळ खाटांची कमतरता जाणवत असल्याने खास दिल्लीसाठी इस्पितळ म्हणून वापरता येतील, अशा प्रकारे पूर्मपणे सुसज्ज केलेले रेल्वेचे ५०० प्रवासी डबेही उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे पाच हजार अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध होतील.
फलदायी बैठक
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची बैठक खूपच फलदायी झाली व त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बैठकीनंतर सांगितले. केंद्र व दिल्ली सरकार मिळून एकजुटीने राजधानीतील कोरोना संंकटावर नक्कीच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीमधील ९ ते ४९ खाटांची सोय असलेली सर्व मल्टी स्पेशालिटी नर्सिंग होम यापुढे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी राखून ठेवण्याचा आदेश दिल्ली सरकारने रविवारी काढला. यामुळे ५००० अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.