CoronaVirus: कोरोनापासून लष्कराला दूर ठेवण्यात यश- राजनाथसिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:41 AM2020-04-21T00:41:23+5:302020-04-21T06:45:39+5:30
सीमापलीकडील आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज
नवी दिल्ली : देशाच्या लष्करातील जवानांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. सीमेपलीकडून येणाºया कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या मंत्रीगटाचे राजनाथ सिंह हे प्रमुख आहेत. ते म्हणाले की, भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या जवानांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी काही नियमही तयार केले असून त्यांचे जवानांकडून अत्यंत काटेकोर पालन होत आहे. सीमेपलीकडून कोणीही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
वेस्टर्न नेव्हल कमांडच्या २६ नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली होती. या साथीमुळे लष्कराच्या हालचालींवर तसेच युद्धसज्जतेवर परिणाम झाला असल्याची चर्चा होती. त्या गोष्टीचा राजनाथ सिंह यांनी ठाम शब्दांत इन्कार केला. ते म्हणाले की, भारताचे लष्कर कोणत्याही स्थितीचा मुकाबला करायला सक्षम आहे. कोरोना साथीच्या दिवसांतही दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत खंड पडलेला नाही. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत.
लष्कराकडून वैद्यकीय, अभियांत्रिकी मदत
राजनाथसिंह म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशातील अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी मदत यासाठी लष्कराचे साहाय्य घेण्यात येत आहे. विदेशांतही मदत पाठविण्यासाठी लष्करी जवानांचे सहकार्य मोलाचे ठरत आहे.
कोरोना साथीचा फैलाव आणखी वाढू नये याकरिता सोशल डिस्टन्सिंग करणे, लष्करी छावणीचा परिसर निर्जंतुक करणे, घरातून काम करणे असे अनेक उपाय लष्कराने योजले आहेत.