Coronavirus: देशात सहा लाखांचा टप्पा पार; जूनमध्ये ४ लाख १४ हजार जणांना कोरोना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:04 AM2020-07-03T01:04:29+5:302020-07-03T07:11:00+5:30
गुजरातमधील (३३ हजार २३२) रुग्णांतही सातत्याने वाढ होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तेथील मृत्युदरही अधिक आहे.
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत नवे १९ हजार १४८ रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आकडा ६ लाखांवर गेला आहे. गेल्या पाच दिवसांतच देशात सुमारे १ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण १७ हजार ८३४ जण मरण पावले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ६ लाख ४ हजार ४१ रुग्ण आढळून आले आहेत.
त्यांच्यापैकी ३ लाख ५९ हजार ८५९ रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या २ लाख २६ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५९.५२ टक्के आहे. देशात या वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास जगातील क्रमवारीत भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या भारताचा क्रमांक चौथा असून, अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसºया व रशिया तिसºया स्थानी आहेत. रशियात आतापर्यंत ६ लाख ६१ हजार १६५ रुग्ण आहेत.
भारतात पहिल्या ११० दिवसांत मिळून १ लाख रुग्ण आढळले होते, तर नंतरच्या अवघ्या ४४ दिवसांत रुग्णसंख्या ६ लाखांवर पोहोचली. सर्वाधिक ४ लाख १४ हजार १0६ जणांना कोरोनाची बाधा जून महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत ४३४ जणांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १९८ महाराष्ट्रातील आहेत. एकूण १७ हजार ८३४ पैकी ८ हजार ५३ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांत आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तमिळनाडूत रुग्णांची संख्या ९४ हजारांवर गेली आहे. आतापर्यंत दिल्ली दुसºया क्रमांकावर होती. पण दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ तुलनेने कमी असून, तिथे आता ८९ हजार ८०२ रुग्ण आहेत. गुजरातमधील (३३ हजार २३२) रुग्णांतही सातत्याने वाढ होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तेथील मृत्युदरही अधिक आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या तीन राज्यांत १८ हजार ते ३२ हजार रुग्ण आहेत, तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व हरयाणा या राज्यांमध्ये १४ ते १८ हजार रुग्ण आहेत. सर्वात कमी म्हणजे ५२ रुग्ण मेघालयात आहेत.
चाचण्यांचे प्रमाण वाढवले
देशात कोरोना चाचण्याही वेगात सुरू असून, आतापर्यंत ९0 लाख ५६ हजारांहून अधिक जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. बुधवारीच २ लाख २९ हजार ५८८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती आयसीएमआरतर्फे गुरुवारी देण्यात आली.