कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 08:41 AM2020-03-19T08:41:34+5:302020-03-19T08:53:36+5:30
बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला.
न्युयॉर्क : कोरोना व्हायरसमुळे जगभरात शटडाऊनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे वाहतूक मंदावल्याने तेलाची मागणीही कमी झाली आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून 16 वर्षांपूर्वीची निचांक गाठला आहे.
बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला. तर ब्रेंट क्रूडच्या किंमती 16 वर्षांपूर्वीची निचांकीवर आल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत 26 डॉलर तर अमेरिकी तेलाची किंमत 23 डॉलरवर आली आहे.
गोल्डमॅन सॅक्सिने सांगितले की, जगभरातील सरकारे कोरोनामुळे लोकांना बाहेर न पडण्याची आणि वेगवेगळे राहण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे वाहनांचा वापर कमी झाला आहे. याचा परिणाम मागणीवर झाला असून मार्चच्या शेवटी तेलाची जागतिक मागणी घटून प्रतिदिन 80-90 लाख बॅरल एवढीच राहू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. तेलाच्या विक्रीमध्ये वार्षिक 11 लाख बॅरल प्रतिदिनची घसरण होऊ शकते. हे एकप्रकारचे रेकॉर्डच असणार आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती येत्या काही दिवसांत 20 डॉलरवर येण्यातची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये ही घट होऊ शकते. बुधवारी ब्रेंट क्रूड 26.65 डॉलरच्या स्तरावर येऊन 26.05 वर व्यवहार करत होते. हा स्तर 2003 नंतरचा सर्वात खालचा आहे. तर अमेरिकी क्रूड सकाळी 4 डॉलरची घसरण नोंदवत 22.95 डॉलर प्रति बॅरल झाले होते. हा मार्च 2002 नंतरचा सर्वात खालचा स्तर आहे.
देशातील इंधनाचे दर जाणून घ्या
दरम्यान, आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेलाच्या किमतींमध्ये डॉलरमध्ये घट होत असतानाही भारतातील इंधनाच्या किंमतीत काही पैशांनी घट करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 75.30 आणि डिझेलचा दर 65.21 रुपये आहे. शेवटचा बदल सोमवारी झाला होता.