CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:06 AM2020-04-20T10:06:19+5:302020-04-20T10:07:42+5:30
लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून
छपरा : लॉकडाऊनमुळे गरीबांचे हाल बेहाल झाले आहेत. अशातच बिहारमध्ये एका बँकेमध्ये वृद्धेची क्रूर थट्टा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनधन खात्यातील पैसे काढण्यास गेलेल्या एका वृद्धेला तुम्ही मयत आहात, तुमच्या खात्यातून पैसे करे देऊ? असे धक्कादायक उत्तर मिळाल्याने तिच्यावर वेगळेच संकट कोसळले आहे. आता या महिलेला ती जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
ही घटना मागील आठवड्यातील आहे. लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून त्या सकाळी सकाळीच बँकेत गेल्या होत्या. चाने देवी पैसे काढण्यासाठी काऊंटरवर गेली तेव्हा तिला तिचे खाते बंद झाल्याचे समजले. तिने कारण विचारले असता उत्तर ऐकून धक्काच बसला. तुमचा मृत्यू झाला आहे, यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आल्याचे चानो देवीला सांगण्यात आले.
हे ऐकल्यानंतर चानो देवीला धक्का बसला. तिला समजच नव्हते की हे कसे झाले. एकीकडे लॉकडाऊन, वरून पैशांची चणचण आणि आता समोर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची धडपड अशी संकटे येऊन ठेपली होती. अखेर तिने बँकेमध्येच याचे कारण विचारले. तेव्हा तिला आणखी मोठा धक्का बसला. तिच्या गावची सरपंच पूनम देवी हिनेच चानो देवी मृत झाल्याचे प्रमाण पत्र बँकेला दिले होते. सरपंच महिलेने चानो यांचा ९ ऑक्टोबर २०१९ मध्येच मृत्यू झाल्याचे लेचर हेडवर लिहून बँकेला दिले होते. धक्कादायक म्हणजे या पत्रावर सरपंचाच्या मुलाची सही आहे. एरव्ही सही जुळत नाही म्हणून खातेधारकांना, चेक वटविण्यासाठी रडकुंडीला आणणाऱ्या बँकेला सरपंचाची सही कशी ओळखता आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून खात्यातील पैसेच तिच्याकडे शेवटचे आहेत. आता तिची मदत कोण करणार असा प्रश्न चानो देवीने उपस्थित केला आहे. तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई सुरु असल्याचे सांगितले आहे.