CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 06:35 AM2021-02-07T06:35:51+5:302021-02-07T06:36:12+5:30

उपचाराधीन रुग्ण १.३७ टक्के; शनिवारी शंभराहून कमी बळी

CoronaVirus daily number of corona patients in the country decreased | CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली

Next

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून, शनिवारी ही संख्या ११७१३ होती. या संसर्गातून १ कोटी ५ लाखांहून अधिक लोक बरे झाले असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आणखी कमी म्हणजे १.३७ टक्के झाले आहे. शनिवारी देशात बळींची संख्या अवघी ९५ एवढी होती.

देशात कोरोना रुग्णांची संख्या १०८१४३०४ असून त्यापैकी १०५१०७९६ जण बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १४८५९० आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १५४९१८ जणांचा बळी गेला व मृत्यूदर १.४३ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे ११७१३ नवे रुग्ण सापडले तर १४४८८ जण बरे झाले. जगभरात १० कोटी ५९ लाख कोरोनारुग्ण असून त्यातील ७ कोटी ७५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेत २ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ७१ लाख रुग्ण बरे झाले.

हवामान बदलामुळे कोरोना साथ?
नवी दिल्ली : हवामान बदल आणि २००२-०३ सालातील सार्स साथीचा विषाणू यामुळे कोरोना विषाणूची साथ आली असावी, असा अंदाज एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. हरितग्रह वायूंमुळे वटवाघळांच्या प्रजातींनी स्थलांतरण केले असावे, त्यांनी आपल्यासोबत विषाणू नेले असावे, असे या अभ्यासात म्हटले आहे.

‘द टोटल इन्व्हायरन्मेंट’ या विज्ञान नियतकालिकाच्या ताज्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांसह जगभरातील गणमान्य संशोधक या अभ्यासात सहभागी झाले आहेत. त्यात म्हटले आहे की, वातावरणीय बदलांमुळे दक्षिण चीनचा युन्नान प्रांत, म्यानमार आणि लाओस या भागात वटवाघळांची संख्या वाढली आहे. 

वटवाघळापासून निर्माण झालेल्या सार्स-कोव्ह-१ आणि सार्स-कोव्ह-२ या दोन विषाणूंचे उगमस्थान याच भागात आहे.  वटवाघळांची मोठी संख्या या भागात आहे. या भागातील वटवाघळांत  अस्तित्वात असलेला विषाणू अन्यत्र गेला. 
अभ्यासात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे काही भागांतून वटवाघळे नाहीसी झाली, तर काही भागात ती नव्याने पसरली. त्यांच्यासोबत मानवासाठी घातक असलेले विषाणूही नव्या भागात गेले. 
मध्य आफ्रिका, मध्य व दक्षिण अमेरिका, दक्षिण चीनचा युन्नान प्रांत आणि शेजारील म्यानमार व लाओस येथे वटवाघळांच्या प्रजांतींत मोठी वाढ झाली आहे. हा हवामान बदलांचा परिणाम आहे. 
म्यानमार आणि लाओस भागात वटवाघळांच्या ४० प्रजाती वाढल्या आहेत. वटवाघळांत आढळणारे १०० नवे कोरोना विषाणू निर्माण झाले आहेत. वटवाघळाची प्रत्येक प्रजाती सरासरी २.६७ कोरोना विषाणूंचे वहन करते. 

Web Title: CoronaVirus daily number of corona patients in the country decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.