Coronavirus: दुबईहून परतला, पार्ट्या केल्या, मॉल्समध्ये गेला; नंतर कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:05 PM2020-03-21T19:05:42+5:302020-03-21T19:06:03+5:30
Coronavirus कोरोनाबाधित व्यक्ती शेकडो व्यक्तींच्या संपर्कात आल्याची भीती
विशाखापट्टणम: कोरोनाबाधित देशांमधून येणाऱ्यांना कॉरेंटाईन होण्याचे आदेश दिले असताना अनेक जण याचं उल्लंघन करताना दिसत आहेत. तेलंगणात कोरोनाचा एक रुग्ण निर्धास्तपणे फिरत असल्याचं समोर आल्यानं यंत्रणांची धाकधूक वाढलीय. आखाती देशांमधून विशाखापट्टणमला परतलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं तपासणीतून समोर आलंय. ही व्यक्ती घरात न थांबता अनेक ठिकाणी फिरल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय.
आखाती देशातून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ही सूचना अमान्य करून त्यानं कुटुंबीयांच्या भेटीगाठी घेतल्या. याशिवाय तो काही पार्ट्यांना गेला. कोरोनाची बाधा झालेली ही व्यक्ती त्यानंतर शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्समध्येही गेली. हैदराबाद आणि विशाखापट्टणम अशा दोन शहरांमध्ये या व्यक्तीनं मुक्तसंचार केल्यानं प्रशासकीय यंत्रणांची झोप उडालीय. ही व्यक्ती नेमकी किती जणांच्या संपर्कात आली, याचा शोध सध्या यंत्रणेकडून घेतला जातोय.
लंडनहून हैदराबादला परतलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती तेलंगणातल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. क्षयरोग रुग्णालयात या तरुणाची चाचणी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं जनआरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी दिली. या तरुणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं तेलंगणातल्या कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहोचलीय.