CoronaVirus News: दिल्लीत दररोज १८ हजार चाचण्या घेण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:40 AM2020-06-16T02:40:52+5:302020-06-16T02:41:14+5:30
सर्वपक्षीय बैठक; राजकारण बाजूला ठेवण्यावर एकमत
नवी दिल्ली : राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याची गरज आहे, असे दिल्लीतील आप पक्षाचे सरकार व तिथे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने म्हटले आहे. येत्या शनिवारपासून दिल्लीत दररोज कोरोनाच्या १८ हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाने तेथील सत्ताधारी आप व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली. त्यामध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता व आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आदी सहभागी झाले होते. संजय सिंह यांनी सांगितले की, दिल्लीत दररोज कोरोनाच्या १८ हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. कोरोनाशी मुकाबला करताना दिल्लीतील विविध रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नेते आदेश गुप्ता म्हणाले की, खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी वाट्टेल ते शुल्क आकारत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना चाप लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत एक अभ्यास गट आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत. त्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मेडिकल विद्यार्थ्यांनाही रुग्णसेवेत सामावून घ्या
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिलकुमार यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ती रोखण्यासाठी केंद्रातील भाजपचे व दिल्लीतील आप सरकार प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. दिल्लीमध्ये कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही कोरोना रुग्णांच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही अनिलकुमार यांनी केली आहे.