coronavirus: न्यायाधीश नियुक्त्याही कोरोनामुळे रखडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:36 AM2020-07-09T04:36:50+5:302020-07-09T04:37:39+5:30
कोरोना महामारीच्या प्रसारास आळा घालण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होण्याखेरीज उच्च व सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी निवड व शिफारस करण्याचे कामही बंद पडले आहे.
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या प्रसारास आळा घालण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होण्याखेरीज उच्च व सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी निवड व शिफारस करण्याचे कामही बंद पडले आहे.
हे काम सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ करते. सर्वोच्च न्यायालयावरील नियुक्त्यांसाठी पाच, तर उच्च न्यायालयांवरील नियुक्त्यांसाठी तीन न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ असते. प्रचलित पद्धतीनुसार ‘कॉलेजियम’ सदस्यांची प्रत्यक्ष बैठक होऊन निर्णय घेतले जातात. या महिन्यात एक व सप्टेंबरमध्ये एक, असे सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. याखेरीज आणखी दोन पदे रिक्त आहेत; पण या पदांवर नियुक्त्यांचा विचार करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत ‘कॉलेजियम’ची बैठक होऊ शकलेली नाही. मध्यंतरी एप्रिलमध्ये प्रत्यक्ष बैठक न घेता ‘कॉलेजियम’ सदस्यांकडे सर्व कागदपत्रे पाठवून त्यावर त्यांची मते घेऊन उच्च न्यायालयांवरील नियुक्त्यांंसाठी काही नावे ठरविण्यात आली होती; नंतर काहीही प्रगती झाली नाही. ज्यांची नियुक्ती करावीशी वाटते त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची पद्धतही ‘कॉलेजियम’ने दोन वर्षांपासून सुरू केली आहे.