धक्कादायक! 'तो' भावाचा मृतदेह शोधत राहिला; दुसऱ्यानं वडील समजून अंत्यविधी उरकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:03 PM2020-06-08T20:03:42+5:302020-06-08T20:15:36+5:30
आता सीसीटीव्हीसमोर मृतदेहाची ओळख पटवल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्याचा रुग्णालयाचा निर्णय
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात मृतांचे नातेवाईक अंत्यविधीसाठी पुढे येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दिल्लीच्या लोकनारायण रुग्णालयात एक वेगळाच प्रसंग घडला. एक जण त्याच्या भावाचा मृतदेह ताब्यात मिळण्याची वाट पाहत होता. मात्र त्याच्या भावाचा मृतदेह दुसऱ्या व्यक्तीनं ताब्यात घेऊन आपले वडील समजून त्यांचा अंत्यविधी उरकला. यानंतर आता रुग्णालयानं सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरच मृतदेहांची ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.
जामा मशीद परिसरात वास्तव्यास असलेल्या अमीनुद्दीन यांनी त्यांचा भाऊ नईमुद्दीनला दोन जूनला एलएनजेपी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला नईमुद्दीन यांनी रुग्णालयात दाखल करून घेतलं जात नव्हतं. मात्र त्यानंतर त्यांना दाखल करून घेण्यात आलं. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता आणि श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. संध्याकाळी ४ वाजता त्यांना दाखल करण्यात आलं. रात्री ईसीजी करत असताना त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी रुग्णालयाकडे मृतदेहाची मागणी केली. मृतदेह कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नईमुद्दीन यांचं कुटुंब ७० तास त्यांच्या मृतदेहाची वाट पाहात होतं.
नईमुद्दीन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सहा जूनला देण्यात आली. त्यानंतर ते भावाचा मृतदेह आणण्यासाठी शवागारात गेले. मात्र त्यांना मृतदेह मिळाला नाही. रविवारी त्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी नईमुद्दीन नावाच्या दोन व्यक्तींचे मृतदेह होते. त्यातील एक जण अमीनुद्दीन यांचा भाऊ होता. तर दुसरा मृतदेह पटपडगंजमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा होता, अशी माहिती त्यांना मिळाली.
रुग्णालय प्रशासनानं अमीनुद्दीन यांच्या भावाचं पार्थिव पटपडगंजमध्ये राहणाऱ्या नईमुद्दीन यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं. त्यांनी दिल्ली गेट परिसरात असलेल्या कब्रस्तानात मृतदेहाचं दफन केलं. मृतदेह ताब्यात घेताना कुटुंबियांनी पडताळणी करायची असते, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. पटपडगंजमध्ये राहणाऱ्या कुटुंबानं केवळ नईमुद्दीन नाव ऐकून मृतदेह ताब्यात घेतला. ते कुटुंब कोरोनामुळे घाबरलं होतं. त्यामुळे त्यांनी मृतदेहाचा चेहरा पाहिलाच नाही, अशी माहिती प्रशासनानं दिली.
बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावर
सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?
मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?
'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ