दिल्लीत १५ दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर, ऑक्सिजनची मागणीही कमी : मनिष सिसोदिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:13 PM2021-05-13T14:13:50+5:302021-05-13T14:16:29+5:30
Coronavirus In Delhi : दिल्लीत ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. केंद्राला कमी ऑक्सिजनसाठी पत्र लिहिल्याची माहिती.
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. परंतु काही दिवसांपासून देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या कमी होतानाही दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र, दिल्ली यांसारख्या भागांना मोठा फटका बसला होता. परंतु आता त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली. तसंच दिल्लीतील ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
"दिल्लीला दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आता कमी होऊन ५८२ मेट्रिक टन इतकी झाली आहे. आम्ही केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे. तसंच आता आमचं काम दररोज ५८२ मेट्रिक टन ऑक्सिजनमध्ये चालेल असं त्यांना कळवण्यात आलं आहे. आमच्या कोट्याच्या अतिरिक्त ऑक्सिजन अन्य राज्यांना देण्यात यावा असंही सांगण्यात आलं आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत फार कमी प्रमाणात ऑक्सिजनच्या इमर्जन्सीसाठी फोन येत आहेत," असं सिसोदिया म्हणाले.
Delhi has reported 10,400 new COVID19 cases in the last 24 hours. The positivity rate has gone down to 14%: Delhi Deputy CM Manish Sisodia pic.twitter.com/6WDl6u3nxX
— ANI (@ANI) May 13, 2021
"सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले होते. परंतु केंद्र सरकारनं केवळ एकदाच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला होता," असंही त्यांनी सांगितलं. १५ दिवसांपूर्वी दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर ३५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला होता. परंतु आता तो १४ टक्क्यांवर आला आहे. नवे रुग्ण १०,४०० च्या जवळपास आहेत. रुग्णालयांतील बेड्सही रिकामे होऊ लागल्याचं सिसोदिया यांनी नमूद केलं.