Coronavirus : 'परराज्यात अडकलेल्या बिहारी नागरिकांच्या खात्यात थेट मदतनिधीची रक्कम जमा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:32 PM2020-04-07T17:32:09+5:302020-04-07T17:33:04+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय.
पाटणा - कोरोनाच्या लढाईत नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन आणि कळकळीची विनंती करण्यात येत आहे. मात्र, तरिही नागरिक घरातून बाहेर पडत आहेत. रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. पोलिसांनी बळाचा वापर सुरु केला, तर पोलिसांशी हुज्जत घालण्यात येत आहे. कोरोनाचं गांभीर्य अद्यापही अनेक शहरांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात दिसून येत नाही. लॉक डाऊनचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणांना पोलीस वेवगेवळ्या प्रकारे धडा शिकवत आहेत. स्थलांतरीत आणि मजूरांना आहे त्याचजागी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर, अनेक राज्य सरकारने या स्थलांतरी मजूरांना आश्रय देत अन्न-पाण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची संख्या जास्त आहे. आपल्या राज्यातील नागरिकांच्या मदतीला बिहार सरकार पुढे आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय. बिहारमधील लाखो नागरिक सध्या विविध राज्यात अडकले आहेत. देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना आपल्या घरी किंवा गावी जात येत नाही. तसेच, जिथं आहोत, तिथही काम बंद असल्याने दैनंदिन जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील मजूर आणि स्थलांतरीत नागरिकांची काळजी घेण्याच काम केलंय.
नितीश कुमार यांनी सोमवारी मुख्यमंत्री विशेष सहायता निधीच्या माध्यमातून बिहार राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना १ हजार रुपयांची मदत दिली. या नागरिकांच्या बँक अकाऊंटमध्ये थेट ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख ३ हजार ५७९ नागरिकांच्या बँक अकाऊंटमध्ये एकूण १० कोटी ३५ लाख ७९ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. बिहार मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे आतापर्यत तब्बल २ लाख ८४ हजार ६७४ जणांनी अर्ज केला होता. या अर्जांची छाननी केल्यानंतर सर्वांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार ही रक्कम पाठविण्यात आली आहे.