CoronaVirus: अल्पखर्चिक तपासणी उपकरण विकसित, आयआयटी दिल्लीच्या संशोधकांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:03 AM2020-04-27T06:03:26+5:302020-04-27T07:32:25+5:30
केवळ पीसीआर चाचणीद्वारे निदान करता येणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांची तपासणी न करता केवळ पीसीआर चाचणीद्वारे निदान करता येणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले आहे. हे उपकरण अल्पखर्चिक असून त्याचा मोठा फायदा देशाला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी सर्व शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संशोधकांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी औषधे आणि इतर गोष्टींवर संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षणसंस्था या दिशेने युद्धपातळीवर काम करत आहेत.
आयआयटी दिल्लीसुद्धा त्याचाच एक भाग आहे. केवळ पीसीआरद्वारे कोरोनाची चाचणी तीसुद्धा अल्प दरात करता येईल, असे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केले. संसर्गाची चाचणी करणारे हे पहिले तपासणीमुक्त उपकरण असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे. पोखरियाल यांच्या हस्ते संशोधन पथकाचा गौरव करण्यात आला. हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयआयटीचे संचालक रामगोपाल राव यांनी व्यक्त केला. याद्वारे चाचणी करण्यासाठी फ्लोरोसंट तपासणीची गरज नसल्याने त्याची संख्या सहज वाढवता येईल. एखाद्या उद्योग समूहाच्या मदतीने ही किट्स तयार करून त्या लवकरात लवकर माफक दारात उपब्ध करून देण्याचा या पथकाचा प्रयत्न आहे.
या उपकरणामुळे केवळ आरोग्यसेवा सक्षम होणार नाहीत, तर सरकारलाही मोठी होईल, असे पोखरियाल म्हणाले.याबाबत त्यांनी आयआयटी दिल्लीतील कुसुमा स्कूल आॅफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधकांचे अभिनंदन केले. या उपकरणाला आयसीएमआरनेदेखील मान्यता दिली आहे.
>पीसीआर आधारित निदान उपकरण विकिसत करून आयसीएमआरची मान्यता मिळवणारे आयआयटी दिल्ली ही देशातील पहिली शिक्षणसंस्था असल्याचे राव यांनी सांगितले आहे. या संशोधनासाठी मंत्रालयाकडून सर्व प्रकारचे साहाय्य मिळेल, असे आश्वासन पोखरियाल यांनी दिले. या कार्यक्र माला मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव आमत खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.