Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:18 AM2020-03-21T10:18:31+5:302020-03-21T10:31:48+5:30
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या पार्टीत उपस्थित असणाऱ्या राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवरांची तपासणी केली जाणार आहे. लंडनहून परतल्यानंतर कनिकाने लखनौ येथे पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत भाजपा खासदार दुष्यंतसिंह हजर होते. त्यामुळे संसदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरु आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. सुमारे १५० खासदार दुष्यंतसिंह यांच्या संपर्कात आले होते. राष्ट्रपती भवनातील चहापानाला दुष्यंतसिंह व राजस्थानचे अनेक खासदारही हजर होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, खासदार अनुप्रिया पटेल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील चहापानाला उपस्थित होत्या. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य नेत्यांनाही कोरोनाचा धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रपतीही कोरोनाची तपासणी करुन घेणार आहेत.
कनिका कपूरच्या पार्टीमध्ये गेलेल्या दुष्यंतसिंह यांनी गेल्या सात दिवसांत संसदेसह अनेक ठिकाणी मुक्त संचार केला. त्यांनी अनेकांची गळाभेट घेतली. काही लोकांसह ते जेवले, काहींशी हस्तांदोलनही केले. मात्र कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांना शुक्रवारीच मिळाली. त्या पार्टीत दुष्यंतसिंह यांच्या मातोश्री वसुंधराराजे शिंदे व कुटुंबातील अन्य सदस्यही होते. सध्या या दोन्ही नेत्यांनी स्वत:ला विलग करुन घेतलं आहे.
दुष्यंतसिंह यांनी मार्च १८ संसदीय कमिटीची बैठकही घेतली होती. यात रेल्वे बोर्डाचे चेअरमन, नागरी उड्डाण खात्याचे आणि पर्यटन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. तसेच दुष्यंतसिंह संसदेत ज्या जागेवर बसतात त्याच्या पुढच्या सीटवर टीएमसीचे खासदार डेरेक ब्रिएन, वरुन गांधी, देवेंदर हुंडा यांच्यासह ६ खासदारांनीही स्वत: विलग करुन घेतलं आहे. कनिकाच्या लखनौ येथील पार्टीत युपीचे भाजपा नेते आणि आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील उपस्थित होते. त्यांनी १७ मार्च रोजी कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती. याबैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य, दिनेश शर्मा यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे या सर्व नेत्यांनाही कोरोनाचा धोका असण्याची शक्यता बळावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एक गायिका, पाच पार्टी, कोरोना आणि लॉक डाऊन, कनिका कपूरविरुद्ध गुन्हा दाखल
कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत!
अरे बापरे; कोरोना रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या कनिका कपूरने 400 जणांसोबत केली होती पार्टी
कनिका कपूरने इन्स्टाग्रामद्वारे दिली तिच्या तब्येतीविषयी माहिती, वाचा काय सांगतेय कनिका