coronavirus: 'डॉक्टरांवरील हल्ले माफीलायक नाहीत, दोषींवर कडक कारवाई करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:39 PM2020-04-02T13:39:10+5:302020-04-02T13:39:50+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले
इंदोर - कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशात रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी याबाबत घोषणा करताना लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहेत. तर, वैद्यकीय क्षेत्र पायाला भिंगरी लावून नागरिक आणि रुग्णांच्या सेवेत गुंतले आहे. मात्र, या तातडीची सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि पोलिसांवरच हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. इंदोरमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा भाजपा नेते आणि माजी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी निषेध केला आहे.
देशात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच इंदोरमध्ये अशी एक घटना घडली की, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांचे बॅरिकेड सुद्धा तोडले आणि मेडिकल टीमला मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई करत लोकांवर नियंत्रण मिळविले. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी निषेध नोंदवला असून हा हल्ला माफीलायक नसल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मानवसेवेचं काम करत असलेल्या सर्वच डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची मागणीही शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी से मेरा अनुरोध है कि मानव सेवा के कार्य में लगे ऐसे सभी डॉक्टर्स अन्य सहयोगियों को पूरी सुरक्षा प्रदान की जाए। साथ समाज और मानवता से खिलवाड़ करने वाले दोषियों को चिन्हित कर उनके खिलाफ कठोरतम कार्यवाही की जाए।@ChouhanShivraj
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 2, 2020
दरम्यान, इंदोरमधील या परिसरात अनेक लोक बाहेरून आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या लोकांची आरोग्य विभागाच्या टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. इंदोरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री एमजीएम मेडिकल कॉलेजने कोरोना बाधितांचा अहवाल जारी केला. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.