CoronaVirus: रुग्णांमध्ये प्रदीर्घ काळ लक्षणं दिसत नसल्यानं डॉक्टर चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:18 AM2020-04-23T02:18:41+5:302020-04-23T07:06:32+5:30
संसर्गाचा धोका; एका रुग्णाच्या ४२ दिवसांत १९ चाचण्या ‘पॉझिटीव्ह’
तिरुअनंतपुरम : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर सुमारे १४ दिवसांत रुग्णामध्ये ‘कोविड-१९’ आजाराची लक्षणे दिसू लागतात, असा सर्वसाधारण समज असल्याने तेवढ्या दिवसांच्या क्वारंटाईनचा नियम ठरविण्यात आला आहे. परंतु, लागण होऊन ४० दिवसांनंतरही लक्षणे दिसत नसूनही ‘पॉझिटीव्ह’ राहणारे रुग्ण आढळल्याने केरळमधील डॉक्टर चिंतेत पडले आहेत. अशा रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका त्यांना सतावत आहे.
ही अडचण लक्षात घेता, संसर्ग झाल्यावर लक्षणे दिसायला दुप्पट म्हणजे २८ दिवसांचा वेळही लागू शकतो, असे गृहीत धरून केरळमध्ये कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन केले जात आहे. तरी त्याहूनही अधिक काळ ‘पॉझिटीव्ह’ राहूनही लक्षणे न दिसणारे रुग्ण कसे हाताळायचे, अशी नवी समस्या आता जाणवत आहे.
मध्य केरळमधील पथनामथिट्टा या जिल्ह्यातील एक ६२ वर्षांची महिला याचे ठळक उदाहरण आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. शिजा यांनी सांगितले, की गेल्या ४२ दिवसांत या महिलेच्या लागोपाठ १८ वेळा चाचण्या घेण्यात आल्या व या सर्व चाचण्या ‘पॉझिटीव्ह’ आल्या आहेत. एवढे होऊनही तिला ‘कोविड-१९’ची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अनेक प्रकारची औषधे बदलून देऊन पाहिली तरी तिच्या शरीरातील कोरोना विषाणू अद्याप पूर्णपणे गेलेले नाहीत.
ही महिला सध्या कुझ्झेनचेरी येथील सरकारी रुग्णालयात आहे. तिला अन्य काही आजार नाही. आता आणखी एक चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली, तर आम्ही तिला कोझिकोडे मेडिकल कॉलेज इस्पितळात पाठविण्याच्या विचारात आहोत. शिवाय आम्ही तिची केस राज्य मेडिकल बोर्डालाही कळविली आहे. पथनामथिट्या जिल्ह्यातच आणखी एका मुलीची केसही काहीशी अशीच आहे. रेल्वेने येताना तिच्या डब्यात दिल्लीच्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन आलेले लोक होते. त्यांच्याकडून तिला संसर्ग झाला. तिला २८ दिवस निगराणीखाली ठेवले; पण कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. अगदी शेवटच्या दिवशी तिला घरी सोडण्याआधी घेतलेली चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. यालाही आता १० दिवस उलटले तरी तिला अद्याप लक्षणे दिसत नाहीत. उत्तर केरळमधील कोझिकोडे येथेही असाच एक रुग्ण आढळला आहे. दुबईहून परत आलेल्या या इसमाला संसर्ग झाल्यानंतर तब्बल ३२ दिवसांनी त्याची चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली. (वृत्तसंस्था)
चीनमध्ये बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटीव्ह
बीजिंग : कोरोना साथीला परिणामकारकपणे आळा घातल्याचे समजून दोन महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’नंतर सार्वजनिक व्यवहार पुन्हा सुरु केल्या गेलेल्या चीनच्या वुहान प्रांतात पूर्ण बरे झाल्याने घरी पाठविलेल्या रुग्णांच्या ६०-७० दिवसांनंतर केलेल्या चाचण्या पुन्हा ‘पॉझिटीव्ह’ येत आहेत. डॉक्टरांना बुचकळ््यात टाकणारे असे किमान १२ रुण आढळल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.
४या रुग्णांच्या एवढ्या दीर्घ काळानंतर केलेल्या चाचण्या ‘पॉझिटीव्ह’ येऊनही त्यांच्यात कोरोनाची कोणताही बाह्य लक्षणे दिसत नाहीत, ही आणखी चिंतेची बाब आहे. यामुळे संसर्ग झाला, की शरीरात त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती आपोआपच निर्माण होते व पुन्हा लागण होत नाही, हा समज यामुळे खोटा ठरत आहे. कोरोना विषाणूचा नव्याने दिसून आलेला हा गुणविशेष नक्कीच चिंता वाढविणारा आहे.