coronavirus: केवळ ग्रीन झोनमधील शहरांसाठीच सुरू होणार देशांतर्गत विमान वाहतूक, केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 05:07 AM2020-05-10T05:07:33+5:302020-05-10T07:45:03+5:30
१७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल.
नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमान वाहतूक ज्यावेळी उड्डाणाचे आणि उतरण्याचे ठिकाण असलेली दोन्ही शहरे ग्रीन झोनमध्ये वर्ग केलेली असतील, तेव्हाच सुरू केली जाईल, असे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत असल्याने अनेक शहरांचे झोनमध्ये करण्यात आलेले वर्गीकरणही सतत बदलत असल्याने देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
१७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल. सुरुवातीला देशांतर्गत विमान वाहतूक सुरू केली जाईल. पुढच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे पुरी म्हणाले.
विमान मंत्रालयाने विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची ६४ विमाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात जवळपास १.९ लाख भारतीयांना परत आणले जाणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम असणार
आहे.
जगभरात साथ सुरू असल्यामुळे सर्वच देशांतील विमान वाहतूक ठप्प आहे. आंतरराष्टÑीय विमान वाहतूकही बंद असून, ती सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. (वृत्तसंस्था)
सोशल डिस्टन्सिंगमुळे तिकिटे महागणार?
च्विमानात प्रवासी वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतही सरकार चर्चा करीत आहे. मात्र कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे की, या कारणासाठी विमानात काही सीट्स रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला तर यासाठी प्रवाशांकडून अधिक तिकीट आकारावे लागेल.