coronavirus: देशांतर्गत विमान सेवा सुरू होण्याच्या बेतात, मंत्री पुरी यांचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:32 AM2020-05-13T06:32:24+5:302020-05-13T06:32:55+5:30
उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात भारतात ‘संपर्क विरहित’ विमानसेवा सुरू करण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप येत आहे. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी हे अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा हळूहळू का असेना सुरू व्हावे यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या या योजनेवर दिवसरात्र काम करीत आहेत.
उड्डयन मंत्रालयाने टास्क फोर्स आणि मंत्रीगटाला हे सांगितले आहे की, देशांतर्गत उड्डाणे आता आणखी विलंब न लावता सुरू करणे ही तातडीची गरज आहे. विमान कंपन्या, विमानतळे आणि त्यांच्याशी संबंधित इतर अनेकांचे २४ मार्चपासून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. आता रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे आणि हळूहळू का असेना विमान सेवेला सक्रिय होण्याची मुभा दिली गेली आहे.
ज्या राज्यांतून प्रवासी पाठवला जाणार आहे आणि ज्या राज्यात तो स्वीकारला जाणार आहे आणि या दोन्ही राज्यांना स्थानिक प्रवाशांची सोय करण्याची मुभा दिली गेली आहे तेथेच हवाई सेवा सुरू केली जाईल व अशा राज्यांच्या संपर्कात नागरी उड्डयन मंत्रालय आहे. विमानातील मध्यभागीच्या सीटबद्दल (मिडल सीट) हरदीप पुरी यांनी स्पष्ट केल्याचे समजते की, जगात कोठेही नागरी उड्डयन क्षेत्रात मधले सीट रिकामे ठेवण्याचा पर्याय नाही. पुरी असेही म्हणाले की, मधले सीट रिकामे ठेवले तरी इकॉनॉमी क्लासच्या मांडणीत आईल सीट आणि खिडकीकडील सीट यांच्यातील अंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी नवे प्रतिबंधात्मक उपाय पाळता येतील अशी कल्पक उपाययोजना करावी.
सगळ्या प्रवाशांना त्यांचे वेब चेक-इन घरी पूर्ण झाल्यानंतरच विमानतळावर येण्याचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. विमानतळावरील रिपोर्टिंग वेळ दोन तासांनी वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे. काय काय करता येईल यासाठी मंत्रालय विमान कंपन्यांबरोबर काम करीत आहे. स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) ठरवली जात
आहे. विमान कंपन्या, विमानतळ चालक, सुरक्षा अधिकारी, उद्योग संघटना यांनाही विश्वासात घेतले जात आहे.
जोखीम आहेच, पण...
मिळालेल्या माहितीनुसार हरदीप पुरी यांनी जगातील उत्तम खबरदारीचे उपाय असलेला तपशीलवार अहवाल सादर केला आहे. त्यात विमानतळाबाहेर प्रवाशांची स्क्रिनिंग, विमानात आल्यावर स्क्रिनिंग आणि आगमन झाल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईनचा समावेश आहे.
तथापि, पुरी यांनी हे मान्य केले की, देशांतर्गत विमानसेवा सुरू करणे यात काहीशी जोखीम आहेच; परंतु आता आम्हाला कोरोनासह जगायचे कसे, याची सवय लावून घ्यावी लागेल, असे ते म्हणाल्याचे वृत्त आहे. दुसरे म्हणजे देशांतर्गत विमान प्रवास हा काही घाऊक प्रमाणात सुरू केला जाणार नाही, तर तो मोजून मापून असेल.