coronavirus : देशांतर्गत विमानसेवा जमिनीवर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 06:16 PM2020-03-23T18:16:05+5:302020-03-23T18:16:13+5:30
प्रवासी वाहतुकीमधून होणाऱ्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशातील रेल्वे वाहतूक आधीच थांबवण्यात आली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व विमान कंपन्यांची देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक संपूर्णपणे बंद होणार आहे. या निर्णयाच्या योग्य अंमलबजावणीसाठी सर्व विमान वाहतूक कंपन्यांना सर्व उड्डाणे आपल्या निर्धारित ठिकाणी मंगळवारी रात्री 12 वाजण्यापूर्वी उतरतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवासी वाहतुकीमधून होणाऱ्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशातील रेल्वे वाहतूक आधीच थांबवण्यात आली आहे. तर सार्वजनिक रस्ते वाहतुकही मर्यादित ठिकाणी सुरू आहे. देशामध्ये दरदिवशी सुमारे 6500 विमान उड्डाणे होतात. तर दरवर्षी सुमारे 144.17 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात.
दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढून सव्वाचारशेपार पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत होते.