coronavirus: कोरोनाची व्याप्ती समजण्यासाठी घरोघरी जाऊन चाचण्या, ६८ जिल्ह्यांमध्ये २४ हजार व्यक्तींची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 05:31 AM2020-05-14T05:31:28+5:302020-05-14T05:32:24+5:30
विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हे मारकद्रव्य सधारणपणे १० ते १४ दिवसांनी रक्तात तयार होत असते. हे मारकद्रव्य रक्तात आढळले तर त्या व्यक्तीला विषाणूसंसर्ग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येतो. अशा चाचण्यांना ‘सेरो सर्व्हे’ असे म्हटले जाते.
नवी दिल्ली : सध्या आढळून आलेल्या कोरोनाबाधितांखेरीज देशातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना या रोगाचा संसर्ग झालेला असू शकेल याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घरोघरी जाऊन ‘रॅण्डम’ चाचण्या घेण्याची नवी मोहीम सुरू केली आहे.
यात ६९ जिल्ह्यांमधील २४ हजार प्रौढ व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात येतील. यामुळे या विषाणूच्या संसर्गाच्या संभाव्य व्याप्तीचा अंदाज करता येऊ शकेल.
‘आयसीएमआर’चे एक संशोधक डॉ. तरुण भटनागर यांनी सांगितले की, या चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीच्या रक्तात ‘इम्युनोग्लोब्युलिन जी’ (आयजीजी) हे घातक विषाणू नष्ट करणारे मारकद्रव्य (अॅन्टिबॉडी) तयार झाले आहे की नाही, हे तपासले जाईल.
विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हे मारकद्रव्य सधारणपणे १० ते १४ दिवसांनी रक्तात तयार होत असते. हे मारकद्रव्य रक्तात आढळले तर त्या व्यक्तीला विषाणूसंसर्ग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येतो. अशा चाचण्यांना ‘सेरो सर्व्हे’ असे म्हटले जाते.
या चाचण्यांसाठी कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत या निकषावर संसर्गाचे प्रमाण निरनिराळे असलेले ६९ जिल्हे निवडण्यात आले आहेत. अशा जिल्ह्यांमधील प्रत्येकी १० ‘क्लस्टर’मध्ये प्रत्येकी ४०० कुटुंबांची सरधोपटपणे (रॅण्डम) निवड करून त्या कुटुंबातील प्रत्येकी एकता प्रौढ व्यक्तीची चाचणी केली
जाईल.
याखेरीज कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या इस्पितळे व आरोग्य केंद्रांमध्ये वेगळ्या चाचण्या घेण्याची एक स्वतंत्र मोहीमही सध्या सुरू आहे. या चाचण्या देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहेत.
या चाचण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सहा सरकारी व चार खासगी इस्पितळांची निवड केली जाते. यात अशा प्रत्येक इस्पितळात १०० आरोग्यसेवक, फ्ल्यूची लक्षणे नसलेले ५० ‘ओपीडी’ कर्मचारी व ५० गर्भवती महिलांच्या ‘आरटी-पीसीआर’व ‘अॅन्टिबॉडी’ चाचण्या घेतल्या जातात.
या दोन्ही प्रकारच्या चाचण्या समाजात तीव्र प्रकारच्या श्वसनरोगांच्या रुग्णांचे (एसएआरआय) प्रमाण किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी केल्या जातात.
‘आयसीएसआर’ने याआधी १८ एप्रिल रोजी अशाच एका ‘एसएआरआय’ चाचणी सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले होते. त्या चाचण्या १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या काळात २० राज्यांच्या ५२ जिल्ह्यांमध्ये ५,९११ रुग्णांवर केल्या गेल्या होत्या. त्यात १०४ रुग्णांना (१.८ टक्के) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.