coronavirus: डॉ. आठवलेंकडून १ कोटी अन २ महिन्यांचं वेतन, गरजूंना 'संविधान' बंगल्यावर मोफत जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:26 PM2020-03-31T12:26:17+5:302020-03-31T12:31:18+5:30
दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो,
मुंबई - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी मोदींनी PM-CARES फंडची निर्मिती केली आहे. मोदींनी PM-CARES फंडच्यामद माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन केल आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण पुढे येत आहेत. तसेच राजकीय नेतेही पुढाकार घेत आहे. खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कोरोनाच्या लढाईसाठी पंतप्रधान निधीत खासदार निधीतून १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ महिन्यांचं वेतनही दिलं आहे.
माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार पी चिदंबरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान दिलं. याबद्दल राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनीही कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत १ कोटी रुपयांची मदत केली होती. आता, रामदास आठवले यांनी १ कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान निधीसाठी देऊ केला आहे. तसेच, रामदास आठवले यांच्या संविधान या बंगल्यावर गरजूंसाठी १४ एप्रिलपर्यंत मोफत जेवण्यात देण्यात येत आहे. आठवले यांनी आज सकाळी संविधान बंगल्यावर गरजूंना मोफत जेवण देऊ केलं.
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती महामहिम वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाच्या लढ्याला मदत करण्यासाठी पीएम केयर फंडात माझ्या खासदार निधीतून 1 कोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात माझ्या दोन महिन्याचे वेतन देण्याचा आज निर्णय घेतला.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 29, 2020
दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी, PM-CARES फंडच्या अकाउंट संदर्भातील महत्वाची माहितीही पोस्ट केली होती. PM-CARES फंडाच्या माध्यमातून मायक्रो डोनेशनही स्वीकारले जाईल. आपले हे डोनेशन आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करेल आणि नागरिकांच्या संरक्षणावरील संशोधनास प्रोत्सहित करेल. आपल्या भवी पिढ्यांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भारत बनवण्यासाठी कसलीही कसर सोडू नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
हातावर पोट असणाऱ्या मजुरांना;गरजूंना आज पासून 14 एप्रिल पर्यंत संविधान निवासस्थानी मोफत भोजन वाटप सुरू केले. pic.twitter.com/3wvmXpt3s7
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 30, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अदानी फाऊंडेशननं PM-CARES फंडसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. या मदतीव्यतिरिक्त आम्ही सरकार आणि जनतेची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू, असंही अदानी फाऊंडेशननं सांगितलं आहे. अदानी ग्रुपशिवाय जेएसडब्ल्यू समूहानंही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली समूहानं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे देणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कंपनीचे कर्मचारी एका दिवसाचं वेतनही दान करणार आहेत. सध्याचे कोरोनाचे संकट पाहता आपत्कालीन परिस्थितीत जेएसडब्ल्यू ग्रुप 'पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी' (पीएम-केअर फंड)मध्ये १०० कोटी रुपये देणार आहे, असंही जेएसडब्ल्यू समूहानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.