coronavirus : लॉकडाऊन काळात 'या' सुविधा मिळणार, ही दुकानं अन् संस्था सुरु राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:31 PM2020-03-24T22:31:07+5:302020-03-24T22:31:52+5:30
पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याचे सांगत देशावासियांसाठी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले
मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. त्यानंतर, मोदींनी आज पुन्हा देशवासियांना संबोधित केले आहे.
पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याचे सांगत देशावासियांसाठी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, जान है तो जहान है... असे म्हणत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. तर, देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असेही मोदींनी सांगितले. या लॉक डाऊन काळात नेमंक काय बंद राहणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सर्व जीवनावश्यक वस्तू सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ न घालता, अफवा न पसरवता गर्दी टाळून या सेवांचा लाभ घेतला पाहिजे.
देशातील व्यापारी आणि खासगी संस्था या लॉक डाऊन काळात बंद राहणार आहेत. त्यामध्ये, अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
यांना देण्यात आलीय सवलत
रेशन दुकान, किराणा मालाचे दुकान, फळे आणि भाजीपाला, दुध केंद्र, मटन आणि मासे यांची दुकाने, जनावरांचे खाद्य इत्यादीं दुकानांना या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.
बँक, इन्शुरन्स कार्यालय आणि एटीएम मशिन्स
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया
टेलिकम्युनिकेशन, इंटरनेट सेवा, आयटी आणि आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा अत्यावश्यक), या सेवांनाही शक्य तो वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यात आली आहे.
अत्यावश्यक मालाची वाहतूक, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य तेही ई-कॉमर्स व्यवहारातून
पेट्रोल पंप, एलपीजी पेट्रोलियम सेवा, गॅस सिलेंडर रिटेल आणि स्टोअरेज
विद्युत निर्मित्ती, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सेवा
कोल्ड स्टोअरेज आणि पाणीपुरवठा केंद्र
खासगी सुरक्षा सेवा
तसेच वर्क फ्रॉम होम या सुविधेनं चालणाऱ्या इतर संस्थांनाही यातून वगळण्यात आले आहे.